घरगुती वापरासाठीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचाही तुटवडा !
तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखाच हा प्रकार आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे, इंजेक्शन्स, उपकरणे यांचा तुटवडा निर्माण होणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणतीच नसेल. हे एक प्रकारे रुग्णांच्या जीविताशी खेळणेच झाले. अशा कर्तव्यशून्य आणि कामचुकार लोकांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
पुणे – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविर पाठोपाठ आता गंभीर रुग्णांना दिल्या जाणार्या टोसिलिझुमॅब इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.
याचसमवेत गेल्या काही दिवसांमध्ये देशात प्राणवायूची टंचाई निर्माण झाल्यामुळे घरगुती वापरासाठीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या वैद्यकीय उपकरणाचाही तुटवडा निर्माण झाल्याने त्याच्या मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत नाही. तैवान, चीन आणि अमेरिका येथून हे उपकरण भारतात येते; पण गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेमध्ये हे उपकरण उपलब्ध नसल्याने त्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही स्थानिक आस्थापनांची चर्चा करून या उपकरणाचे उत्पादन करण्यासाठी प्रयत्न चालू केले असल्याचे एम्.सी.सी.आय.चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी सांगितले.
दुसर्या आस्थापनाच्या सहकार्याने हे उपकरण बनवले जाणार आहे; मात्र प्रत्यक्ष उत्पादन करण्यासाठी आणखी काही काळ लागेल असे ‘नोक्का रोबोटिक्स’चे निखिल कुरेले यांनी सांगितले.