हिंदुद्वेषाचा घातक विषाणु !

कोरोनाच्या वाढत चाललेल्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळा समाप्तीची घोषणा निरंजनी आखाड्याने केली. त्याला प्रतिसाद देत अनेक आखाड्यांनी कुंभमेळ्यातून परत जाण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून सांगितले की, ‘आचार्य महामंडलेश्‍वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. याविषयी मी संतसमाजाचे आभार मानले. त्याचबरोबर मी प्रार्थना केली की, दोन शाहीस्नान झालेली आहेत. कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्यास ताकद मिळेल.’ देशाच्या प्रमुखाने संतसमाजाशी एवढ्या नम्रतेने बोलणे, हे देशाने यापूर्वी कदाचित् पाहिले नसावे. अनेकांनी कुंभक्षेत्र रिकामे करण्यास आरंभ केला आहे. संतांच्या या भूमिकेमुळे कुंभमेळ्याला लक्ष्य करणार्‍यांची मात्र चांगलीच गोची झाली. त्यांना आता हिंदु धर्माला लक्ष्य करण्याची सोय राहिलेली नाही. तसेही अशांना हिंदु धर्माला लक्ष्य करण्यासाठी कुठलेही निमित्त चालते; कारण त्यांना हिंदुद्वेषाच्या घातक विषाणूचा संसर्ग झालेला असतो आणि त्याचा प्रसार ते वेळोवेळी करत असतात. असे निमित्त मिळाले नाही, तर ते ओढून-ताणून कुठल्याही सूत्राचा संबंध हिंदु धर्माशी जोडून हिंदु धर्माला अपकीर्त करत असतात. अशाच गटातील उपटसुंभांनी हिंदूंच्या प्राचीन कुंभमेळ्याची तुलना मरकजशी करून स्वतःची बौद्धीक दिवाळखोरी दाखवून दिली. हिंदु धर्माचा काडीचा अभ्यास नसलेलेच अशी टीका करू शकतात.

सौजन्य : www.citylive.news

मरकजवाल्यांच्या कुकत्यांकडे दुर्लक्ष का ?

मूळात मरकज आणि कुंभमेळा यांची तुलनाच होऊ शकत नाही. या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनाच्या उद्देशांपासून ते प्रत्यक्ष कार्यवाहीपर्यंत पदोपदी भेद दिसून येतो. मागच्या वर्षी मरकज प्रकरण घडले, तेव्हा ‘मरकज’ हा शब्दच भारतियांनी प्रथम ऐकला. त्या काळात जसजशा त्यांच्या गंभीर कृती बाहेर येत गेल्या, तसतशी त्यांची विकृत मानसिकता जगासमोर आली. सर्वप्रथम मरकजच्या कार्यक्रमाला पोलिसांची अनुमती घेण्यात आली नव्हती. येथेच त्यांची कायदाद्रोही मानसिकता दिसून येते. कुंभमेळा मात्र सरकारच्या अनुमतीने आणि पुढाकाराने भरवला गेला. मरकजमधील कार्यक्रमात अनेकांना कोरोना झाल्याचे लक्षात आल्यानंतरही सर्व लपवून ठेवण्यात आले. याच कारणामुळे कोरोना अधिक पसरला. याउलट कुंभमेळ्यात कोरोनाचा ‘निगेटिव्ह रिपोर्ट’ असल्याखेरीज कुंभनगरीत प्रवेशच दिला जात नव्हता. उत्तराखंडच्या सीमांवर, विमानतळावर, तसेच रेल्वेस्थानकांवर कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. साधू-संतही कोरोना चाचणीला स्वतःहून सामोरे गेले आणि अनुयायांनाही जायला लावले. हरिद्वारच्या कुंभमेळ्यातील साधूंमध्ये कोरोनाविषयी कमालीची जागृती दिसून आली. अनेक आखाड्यांमध्ये मास्क आणि सॅनिटाझर यांचे वाटप केले जात होते. तेथे सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते. ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली, त्यांनी लगेच स्वतःचे अलगीकरण करून घेतले. इतकी सतर्कता, समाजिक भान आणि पारदर्शकता कुंभमेळ्यात जपण्यात आली. यातील कुठली गोष्ट मरकजमध्ये केली गेली, याचे उत्तर मरकजचे समर्थन करणार्‍यांनी आणि कुंभमेळ्यावर टीका करणार्‍यांनी दिले पाहिजे. मरकजमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाला आत शिरण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले होते ? किती पोलीस आणावे लागले होते, हे सर्वज्ञात आहे. याउलट कोरोनाचे वाढते गांभीर्य पाहून कुंभमेळ्यातील साधूसंतांनी स्वतःहूनच कुंभसमाप्तीची घोषणा केली, हे विशेष.  मरकजवाल्यांची माणुसकीला काळीमा फासणारी हिडीस कृत्ये तर संपूर्ण जगाने पाहिली. कोरोना रुग्णांना तपासण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवर काही मरकजवाले थुंकत होते, काहींनी उघडपणे मलमूत्र विसर्जनाचे विकृत प्रकार केले. काहींनी वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांच्यावर आक्रमण केले. एवढे नव्हे, तर अनेकांनी महिला कर्मचार्‍यांशी अश्‍लील वर्तनही केले. अशी कृत्ये कुंभमेळ्यातील सहभागी एकाने तरी केली आहेत का ?, हे कुंभमेळ्यावर टीकाकारांनी सांगावे. यामुळेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनीही कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना योग्य नसल्याचे सांगितले.

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना करायचीच असेल, तर ती वरील सूत्रांवर करायला हवी. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या लोकांनी त्या वेळी मरकजचे समर्थन केले, तेच आज कुंभमेळ्यावर टीका करत आहेत. आता हेच लोक रमजानच्या पार्श्‍वभूमीवर असे डोस पाजतील का ? की नेहमीप्रमाणे बिळात जाऊन बसतील ?, हा खरा प्रश्‍न आहे. कुंभमेळ्यातील अजून २ पवित्रस्नान शेष आहेत. ते काही जणांच्याच उपस्थितीत प्रतिकात्मक रूपात संपन्न होतील आणि कुंभमेळा समाप्त होईल. हिंदु धर्मातील साधूसंतांनी दाखवलेल्या या लवचिकतेविषयी आता हिंदुद्वेष्टे मूग गिळून गप्प का आहेत ?

हिंदुद्वेषी विषाणुवरील उतारा !

कुंभमेळा पाहिल्यावर कंठ फुटणार्‍यांची मरकजवाल्यांच्या वरील कृत्यांविषयी दातखिळी का बसली होती ? त्यांच्यावर त्यांनी टीका का केली नाही ? त्यांना ‘कोरोना बॉम्ब’ म्हणायचे धाडस त्यांनी का दाखवले नाही ? कुंभमेळ्याविषयी इतकेच वाटले असते, तर त्यांनी कुंभमेळ्यातील भक्तांच्या हिताच्या दृष्टीने प्रत्यक्ष कृती केली असती. निदान काही उपाययोजना तरी सूचवल्या असत्या; पण डोळ्यांवर हिंदुद्वेषाचा चष्मा चढवल्यावर कुणाचे हित वगैरे दिसत नसते. त्याऐवजी चार ओळींचे फुटकळ ट्वीट करून हिंदुद्वेषाच्या घातक विषाणूचा प्रसार करण्यात त्यांना मर्दुमकी वाटली. अशा हिंदुद्वेषी विषाणुवर मात करायची असेल, तर हिंदूंना संघटनरूपी लस घ्यावी लागेल. ही लस एकदा घेतली की, हिंदूंमधील प्रतिकारक्षमता रूपी एकीचे बळ वाढेल आणि मग असली घातक विषाणु आक्रमणे करण्याचा विचारही कुणी करू धजावणार नाही !