पुण्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा, तसेच डॅशबोर्ड अपडेट करण्यामध्ये विलंब !

व्हेंटिलेटरचा तुटवडा असणे, हे चिंताजनक आहे. महापौरांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, ही अपेक्षा !

सौजन्य : मेडब्रोस हेअल्थ सर्विसेस

पुणे, ७ एप्रिल – महापालिकेच्या सूचनेनुसार प्रत्येक २ ते ४ तासांनी खासगी रुग्णालयांनी डॅशबोर्ड ‘अपडेट’ करणे आवश्यक आहे; मात्र रुग्णालयांकडून डॅशबोर्ड ‘अपडेट’ होण्यास विलंब होत असल्याने नेमक्या किती खाटा उपलब्ध आहेत, याची आकडेवारी तातडीने मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामध्ये टाळाटाळ करणार्‍या रुग्णालयांना नोटीस बजावून त्यांच्याकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले, तसेच व्हेंटिलेटरचाही तुटवडा असून १० नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी मागणी देण्यात आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या ‘हेल्पलाईन सेंटर’ मधील आधुनिक वैद्यांशी चर्चा केली. त्या वेळी एका रुग्णाचे नातेवाईक गेल्या ५ दिवसांपासून व्हेंटिलेटरची मागणी करत असून, त्यांना ते उपलब्ध होत नसल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. या ठिकाणी चौकशी केली असता अद्यापही २० ते २५ रुग्णांचे नातेवाईक व्हेंटिलेटरची मागणी करीत असून ही अवस्था गेल्या काही दिवसांत सातत्याने असतेच अशी माहितीही देण्यात आली.

यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध होण्यास अडचणी आहेत. व्हेंटिलेटरची मुख्य अडचण असून, ती सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ऑक्सिजनसज्ज खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.