धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने
हुपरी (जिल्हा कोल्हापूर), ४ एप्रिल (वार्ता.) – पुरातत्व खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. गडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत. गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे. या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने व्यापक आंदोलन छेडले आहे. आपणही एक ‘हिंदु’ म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने शंभूवंदना कार्यक्रमानंतर ते बोलत होते. या वेळी सर्वश्री प्रवीण पाटील, नितीन खेमलापुरे, रवी कोळेकर, नितीन काकडे, दिग्विजय लायकर, विकास पाटील, राकेश खाडे, वैभव लायकर, भरत मेथे, महादेव आढावकर, सचिन माळी यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
विशेष : विशाळगडाच्या संदर्भात असलेले निवेदन पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, रेंदाळ, यळगुड आणि रणदेववाडी या गावांमध्ये पोचवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या स्वाक्षर्या घेऊन प्रशासनास निवेदन द्यायचे, असे या वेळी ठरले.