पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

१. मखदूमशहाबाबा यांच्यावर मुंबई पोलिसांची श्रद्धा असणे

‘मुंबई येथे माहीम पोलीस ठाण्याच्या जवळच हजरत मखदूमशहाबाबा यांचा दर्गा आहे. मखदूमशहाबाबा सूफी संत (फकीर) असल्याचे म्हटले जाते. ते माहीम पोलीस ठाण्याच्या परिसरात रहायचे. पूर्वीच्या काळी माहीम पोलीस ठाण्याचे पोेलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर बसायचे, तेव्हा बाबा त्यांच्याकडे येऊन बसत असत. त्या वेळी माहीमच्या समुद्र किनार्‍यावर बोटीने तस्करीचा माल येत असे. बाबा कुठल्या बोटीत माल आहे कि नाही ? हे पोलिसांना अचूकपणे सांगायचे. पुढे बाबांचे निर्वाण झाले आणि त्यांचा दर्गाही झाला. एकदा आरोपी मिळाला नाही; म्हणून पोलिसांनी बाबांकडे गार्‍हाणे घातल्यावर ते पूर्ण झाले. त्यामुळे त्यांच्या दर्ग्यावर मुंबई पोलिसांची पुष्कळ श्रद्धा आहे.

२. मखदूमशहाबाबांच्या मिरवणुकीत गणवेशात चादर घेऊन सहभागी होतांना पोलिसांना धर्मनिरपेक्षतेचा सोयीस्कर विसर पडणे

हजरत मखदूमशहाबाबा संदल मिरवणुकीत सहभागी मुंबई पोलिस (सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )

प्रतिवर्षी हजरत मखदूमशहाबाबा संदल मिरवणुकीचे आयोजन होते. तेव्हा मुंबई पोलिसांना पहिला मान दिला जातो. बाबांच्या कबरीवर (समाधीवर) पोलिसांकडून पहिली चादर चढवली जाते. या संदल मिरवणुकीत ज्येष्ठ पोलीस अधिकारी पोलीस गणवेशात असतांना बाबांच्या नवसाची चादर डोेक्यावर घेऊन सहभागी होतात, तसेच ते गोल टोपीही घालतात. या जत्रेविषयी असे समजते की, एका वर्षी ही परंपरा मोडीत काढण्याचा मुसलमान समाजातील काही लोकांनी प्रयत्न केला. तेव्हा उरूसाच्या दिवशी चादर चढवण्याच्या वेळी दर्ग्याचे दार उघडले गेले नाही. जेव्हा ज्येष्ठ पोलीस अधिकारी दाराजवळ जवळ गेले, तेव्हा दार आपोआप उघडले गेले. ‘मखदूमशहाबाबा हे हिंदु-मुसलमान एकतेचे प्रतीक असून पोलिसांचे संत आहेत’, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉय गायकवाड म्हणतात. बाबांच्या जत्रेसाठी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने वर्गणी गोळा केली जाते. ही जत्रा संपल्यानंतर वर्गणी देणार्‍या प्रत्येकाला एक नारळ प्रसाद म्हणून पाठवला जातो. पोलिसांनी हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवासाठी कधी वर्गणी काढल्याचे स्मरत नाही, तसेच हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुकीत ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस गणवेशात डोक्याला फेटा बांधून घेतल्याचेही कधी दिसले नाही.

३. पोलीस अधिकार्‍याने उद्दामपणे मंदिराच्या गाभार्‍यामध्ये चामड्याच्या पट्ट्यासह प्रवेश करून मंदिराचे पावित्र्य घालवणे

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत रमजान मासात विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने इफ्तार मेजवान्यांचे आयोजन केले जाते. याविषयी केल्या जाणार्‍या व्ययाचे गूढ गुलदस्त्यात आहे. या मेजवान्यांमध्ये राजकारण्यांच्या समवेत पोलीस आयुक्त स्तरावरील ज्येष्ठ पोलीस अधिकारीही पोलीस गणवेशात गोल टोपी घालतात, तर दुसरीकडे हिंदु पोलिसांना पोलीस ठाण्यात देवतांचे चित्रे लावण्यासही प्रतिबंध केला जातो. काही वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील एक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी पोलिसी गणवेशात मंदिरात जात असतांना पुजार्‍यांनी त्यांना थांबवले आणि कमरेचा लाल चामडी पट्टा काढून नंतरच आत जाण्यास सांगितले. याचा त्या अधिकार्‍यांना पुष्कळ राग आला. त्यांनी पुजार्‍यांशी भांडण केले, तसेच उद्दामपणे चामड्याचा पट्टा घालूनच मंदिरात प्रवेश केला. ‘मंदिरांचे पावित्र्य राखणे, हे प्रत्येक भाविकाचे कर्तव्य आहे’, याचेही भान या अधिकार्‍यांना नव्हते.

४. धर्मविरोधी कृती सहजपणे टाळल्या जाण्यासाठी हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्यक !

हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून असे प्रसंग वारंवार घडत असतात. तत्कालीन शासनकर्त्यांकडून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदु सरकारी कर्मचार्‍यांना सातत्याने दडपण्यात आले. भारतीय नोकरशाहीत पद्धतशीरपणे सर्वधर्मसमभावाचा रोग पोसण्यात आला. यासाठी स्वातंत्र्यानंतर देशावर बहुतांश काळ राज्य करणारा काँग्रेस पक्ष उत्तरदायी आहे.’

– एक निवृत्त पोलीस अधिकारी

पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : [email protected]