पानिपतच्या तिसर्या लढाईला २६४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘मराठा शौर्यदिन’ साजरा करण्यात आला. पानिपतच्या रणांगणावर धारातिर्थी पडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात मावळ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे पानिपत युद्धानंतर मागे राहिलेल्या आणि आज हरियाणाचे रहिवासी असलेल्या रोड मराठ्यांविषयी चर्चा चालू आहे. याच इतिहासाचे आणखी एक महत्त्वाचे अंग, म्हणजे बलुची मराठे. त्यांच्याच इतिहासाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
बलुचिस्तानमधील बुग्ती मराठे
वर्ष १७६१ मध्ये झालेल्या तिसर्या पानिपत युद्धानंतर मराठा सैनिकांना कैद करून बलुचिस्तानमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांनी परिस्थितीशी हार न मानता जुळवून घेतले आणि आपली मराठी संस्कृती पिढ्यान्पिढ्या जपली. सण-उत्सवांपासून दैनंदिन जीवनशैलीपर्यंत बुग्ती मराठ्यांची संघर्षगाथा ही जिद्दीची परिसीमा दर्शवणारी आहे. कराचीतील मराठी भाषिक समुदाय आज महत्त्वाचा असला, तरी महाराष्ट्रातून पाकिस्तानात पाय रोवणारा हा पहिलाच समूह नव्हता. त्याही आधी आले ते बलुची मराठे. त्यांचे अस्तित्व हे स्थलांतर, कैद आणि जिद्द यांचा एक विलक्षण इतिहास उलगडते. हे मराठे स्थानिक बुग्ती जमातीत विलीन झाले. त्यामुळेच त्यांना ‘बुग्ती मराठे’ म्हटले जाते. वर्ष २०२३ मध्ये प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलुच’ हा मराठी चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने इतिहासात लुप्त झालेल्या एका पर्वाला प्रकाशात आणले. हा चित्रपट वर्ष १७६१ मध्ये तिसर्या पानिपत युद्धानंतर बलुचिस्तानमध्ये नेण्यात आलेल्या मराठा कैद्यांच्या संघर्षावर आधारित आहे.
-डॉ. शमिका सरवणकर
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २८.३.२०२५)