निचरा विचारांचा…प्रवास मनाचा !

लाखो जीव घेणार्‍या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली ! का बरं ? मनाने तो दुर्बल होता का ? मग अशी वेळ त्याच्यावर का आली ? सर्वांच्याच मनात ही उत्सुकता असते. सुंदर विचार देणारे सानेगुरुजी आत्मघात करून घेतात. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनीही प्रचंड मोठे कर्ज झाल्याने आत्महत्या केली. आता ८ मासांपूर्वी ‘नैराश्याशी लढा कसा द्यायचा ?’ हे शिकवणार्‍या शीतल (आमटे) करजगी यांनी त्यांचे जीवन संपवले. उच्चविद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूंच्या पत्नी, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली. प्रत्येक क्षेत्रात अशी कितीतरी उदाहरणे आपणास दिसतील. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात संघर्ष हा असतोच; परंतु आत्महत्या हा त्यावरील मार्ग किंवा उपाय नाही. मनातील विचारांचा निचरा योग्य पद्धतीने करून योग्य मार्गदर्शन घेऊन जीवनात पुढे मार्गक्रमण करणे आवश्यक असते.

मनातील विचारांना योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे. आवश्यक, अनावश्यक, तसेच सकारात्मक आणि नकारात्मक विचार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. अंतर्मुख आणि स्थिर बुद्धीचा माणूसच हे करू शकतो. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो: ।’ (मैत्रायण्युपनिषद्, प्रपाठक ४, श्लोक १४), याचा अर्थ ‘मन हेच मनुष्यांच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे.’ समर्थ रामदासस्वामी यांनी केवळ मनावर १०८ श्लोक लिहिले आहेत. ‘मनाचे श्लोक’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मन हेच सर्वांचे मूळ कारण असते. रोगांपासून षड्रिपूंपर्यंत सर्व काही मनाची स्थिती बिघडली की, ते वाढतात. मनातील साठलेल्या विचारांचा निचरा होणे, हेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे मन मोकळे होणे, महत्त्वाचे असते. मनाचा हा निचराही योग्य ठिकाणी होणे पुष्कळ महत्त्वाचे असते. ‘कुणाशी तरी बोललो आणि आपले मन मोकळे झाले’, असे वाटते. हे तात्पुरते असते; कारण परत तसेच विचार मनात येतच रहातात.

‘चुकीचे विचार मनात परत येणारच नाहीत’, अशीच उपाययोजना, म्हणजे त्या विचारांचे मूळ शोधणे. हे मूळ कुठेतरी आपल्याच स्वभावदोषांमध्ये असते. ते शोधून त्या दोषांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी आपल्याला योग्य दिशा देणारी सक्षम आध्यात्मिक व्यक्ती हवी, तसेच मनाची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जावी आणि सद्सद्विवेकबुद्धी निर्माण व्हावी, यासाठी नामजपादी साधना करणे आवश्यक असते. योग्य साधना केल्यास नैराश्य दूर होऊन अत्यल्प कालावधीत लाभ होऊन आपले जीवन आनंदी होते.

– सौ. गौरी वैभव आफळे, गोवा.