धर्म ‘मनुष्यजीवन कशासाठी आहे’, हे सांगण्यासह ते साध्य होण्यासाठी हिंदु पंचांगरूपी कालयोजना आवश्यक !

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

‘हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती, कुर्ला (प.)’ यांच्या वतीने कुर्ला (मुंबई) येथे २५ मार्च या दिवशी ‘हिंदु दिनदर्शिके’चे प्रकाशन भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रकाशित केले. या कार्यक्रमात पू. (प्रा.) सु.ग. शेवडे म्हणाले, ‘‘ख्रिस्ती कॅलेंडर हे केवळ कालगणनेसाठी सिद्ध करण्यात आले असून हिंदु पंचांग कालयोजनेसाठी आखले जाते.’’ पू. (प्रा.) सु.ग. शेवडे हे कार्यक्रमानंतर परत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आले, त्या वेळी त्यांची भेट झाली. तेव्हा मी त्यांना ‘हिंदु पंचांग कालयोजनेसाठी आहे, हे वाक्य पुष्कळ बोधप्रद आहे’, असे म्हणालो. त्यावर त्यांनी ‘बोध काय झाला ? हे लिहून द्या’, असे सांगितले.

डॉ. दुर्गेश सामंत

इंग्रजीत सांगायचे झाले, तर कालगणना, म्हणजे ‘टाइम मेजरमेंट किंवा टाइम काऊंटिंग’, तर कालयोजना, म्हणजे ‘टाइम प्लॅनिंग’. ‘कालयोजनेमध्ये मनुष्याने येत्या वर्षभरात कोणत्या मासात कोणत्या दिवशी, कधी काय करावे आणि काय करू नये, हे सांगितलेले असते. यात मग चातुर्मास कधी करावा ?, इथपासून कोणत्या विधीसाठी अथवा कार्यासाठी योग्य किंवा शुभ दिवस कोणता ?, कोणता दिवस निषिद्ध, तसेच सूर्याेदय कधी होणार ? चंद्रोदय कधी होणार ? कोणते व्रत कधी करावे ?, त्याचा उपवास कधी सोडावा ?’, असे सगळे सांगितलेले असते. उदाहरणार्थ संकष्टीचे व्रत आाणि चंद्रोदय कधी होणार ? हे त्या दिनांकाला लिहिलेले असते. या व्रताच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन त्या दिवशीचा उपवास सोडतो. थोडक्यात धर्मातील वैदिक किंवा धार्मिक कृत्ये काळाशी जोडलेली आहेत. ही कृत्ये मनुष्यावर योग्य संस्कार होऊन त्यात सत्त्वगुण वाढावा, यासाठी आहेत. हे चांगल्या प्रकारे व्हावे, यासाठी ही कालयोजना असते. ‘धर्म मनुष्यजीवन कशासाठी आहे’, हे सांगत असतो आणि ते साध्य होण्यासाठी कालयोजना आवश्यक असते.

पू. (प्रा.) शेवडे यांच्या वरील वाक्यामुळे दिनदर्शिकेकडे पहायची एक वेगळी दृष्टी मनावर ठसते. ज्या वार्ताहराने हे वाक्य नेमके टिपून बातमीसाठी पाठवले, तसेच ज्या उपसंपादकाने ते वाक्य बातमीतून न काढता ठेवले, हे दोन्हीही अभिनंदनास पात्र आहेत, असे मला वाटते.

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२५)