रामनाथी आश्रमात कार्यक्रमाचे आयोजन करतांना मनात कर्तेपणाचे विचार आल्याविषयी साधकाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची केलेली पत्ररूपी क्षमायाचना !

श्री. बाळासाहेब विभूते यांनी लिहिलेल्या या लेखावरून एखादी चूक झाली, तर तिच्यातून शिकायचे कसे, याचा आदर्श त्यांनी सर्व साधकांपुढे ठेवला आहे. असा दृष्टीकोन नेहमी ठेवल्यास त्यांची पुढील प्रगती लवकर होईल, यात शंका नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्री. बाळासाहेब विभूते

आदरणीय श्रीसत्शक्ति बिंदाताई,

साष्टांग नमस्कार.

जून २०१२ मध्ये श्री हालसिद्धनाथांचा ‘वालंग’ भंडारा आणि भाकणूक यांचा कार्यक्रम सनातनच्या रामनाथी आश्रमात झाला होता. त्या वेळी मी आपल्या आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संपर्कात राहून सदर कार्यक्रमासाठी समन्वय केला होता. तेव्हा माझ्याकडून झालेल्या चुकीसाठी मी प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी क्षमायाचना करत आहे.

याविषयीचा समन्वय करत असतांना ‘कार्यक्रमासाठी येणारा व्यय आम्ही करणार. श्री हालसिद्धनाथही आमचे आहेत आणि सनातन संस्था, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवलेही आमचेच आहेत’, अशी आत्मप्रौढी मी मिरवली होती. त्या वेळी तुम्ही मला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता; पण त्याचे आकलन मला त्या वेळी झाले नाही. आता भाववृद्धी सत्संगातून आपण जो विषय मांडत आहात, त्यातून माझ्या लक्षात येत आहे, ‘सदरचा कार्यक्रम हा ईश्‍वरी इच्छेने झालेला आहे.’ ईश्‍वराच्या इच्छेविना झाडाचे पानही हलू शकत नाही. त्या वेळी माझा भ्रम होता की, आम्ही देवाला रामनाथीला नेऊन कार्यक्रम करणार. ‘हे सर्व त्याच्याच इच्छेने होत आहे’, हे माझ्या लक्षात आले नव्हते. तो माझा निव्वळ भ्रम होता. ‘आम्ही देवाला रामनाथीला नेणार’, हेच किती हास्यास्पद आहे ! देवानेच आम्हाला निर्माण केले आहे आणि त्यानेच मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांपर्यंत नेले आहे. हे एकेक कोडे आता उलगडत चालले आहे. ‘आपण त्याच्या हातातील कळसूत्री बाहुल्या आहोत. आपण केवळ निमित्तमात्र आहोत’, याची आता मला प्रचीती येत आहे.

‘माझ्या दोन्ही मुलांना आपल्या चरणांशी घट्ट बांधून ठेवा. आपण दिलेल्या उपमेनुसार या शेलारमामाचे दोन्ही मावळे मायाजालात गुरफटू देऊ नका. विभूते कुटुंबियांवर आपले कृपाछत्र असेच राहू द्या’, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना.

‘माझा सर्वच भार भगवंत वहात होता, आहे आणि वहाणार’, याची मला थोडी थोडी कल्पना येत आहे. यातील योग्य-अयोग्य मला कळत नाही.

– आपला कृपाभिलाषी,

श्री. बाळासाहेब विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.२.२०१९)