सातारा शहरातील लक्ष्मी टेकडीसह झोपडपट्टीधारकांना हक्काचे निवासस्थान देण्यासाठी ७ वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या वतीने घरकुल योजना आणली गेली. मोठ्या दिमाखात घरकुल योजनेला प्रारंभ करण्यात आला; मात्र ७ वर्षे उलटूनही घरकुलाच्या भिंतीही चढल्या नाहीत. या ठिकाणी केवळ स्लॅब घालण्याविना दुसरे काहीच होऊ शकले नाही. आता त्या ठिकाणी पत्ते कुटणे, भटक्या कुत्र्यांनी घाण करणे, असे प्रकार चालू आहेत. घरकुलाची सोडत झाल्यानंतर शासनाने झोपडपट्टीधारकांना पैसे भरण्यासाठी घाई केली. त्यामुळे लोकांनी त्या वेळी कर्ज काढून पैसे भरले.
सातारा नगरपालिकेतील सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्या काळात लहान अन् मध्यम शहरी भागासाठी ‘शहरी आधारभूत संरचना विकास योजने’च्या अंतर्गत झोपडपट्टीधारकांसाठी घरकुल योजनेतून इमारती बांधण्यात आल्या. लक्ष्मी टेकडी येथील झोपडपट्टीधारकांची संख्या लक्षात घेता तेथे २ ठिकाणी घरकुले उभारण्यात आली. त्यातील एका ठिकाणचे काम अर्धे झाले असून दुसर्या ठिकाणी केवळ स्लॅब झाले. या घरकुल योजनांतील ३ इमारतींचे स्लॅब आणि खांब (पिलर) उभे आहेत; मात्र त्या ठिकाणी भिंती, दारे, खिडक्या कधी लागणार ? हे सगळे प्रश्न न सुटणारे आहेत. घरकुलासाठी कर्ज काढणारे नागरिक अधिकोषांचे हप्ते भरून मेटाकुटीला आले आहेत. या जन्मात तरी स्वत:चे हक्काचे घर मिळणार का ? याची प्रतिक्षा ते करत आहेत. एके ठिकाणी तर ८ वर्षांपूर्वी घरकुल योजनेची कार्यवाही करण्यासाठी झोपडपट्टी पाण्याच्या टाकीखाली वसवण्यात आली; आता तर त्या पाण्याच्या टाकीचे खांबही सडू लागले आहेत. सातारा नगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘शहरी आधारभूत संरचना विकास योजने’ अंतर्गत ४ सहस्र ५०० नागरिकांसाठी ५२४ घरे बांधण्यात येणार होती; ७ वर्षे उलटल्यानंतर त्यातील केवळ १७१ घरे बांधून पूर्ण झाली असून अद्याप ३५३ घरे अपूर्ण आहेत. हक्काच्या घराचे दिवास्वप्न दाखवणारे पालिका प्रशासन घरकुल योजनांचे घोंगडे किती दिवस भिजत ठेवणार आहे ? असा प्रश्न आता झोपडपट्टीधारकांना सतावू लागला आहे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा