पणजी, ३० मार्च (वार्ता.) – गोवा औद्योगिक विकास महामंडळाला मध्यप्रदेश राज्यात डोंगरी तळ विभाग २ येथे मिळालेल्या कोळशाच्या ब्लॉकमध्ये १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी ३० मार्च या दिवशी गोवा विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी केला.
प्रारंभी जलस्रोतमंत्री फिलीप नेरी यांनी कोळसा ब्लॉक आणि म्हादई यांसंबंधीच्या प्रश्नाला विधानसभेत पुढील वेळी उत्तर देणार असल्याचे सांगितल्यावर विरोध पक्षांनी त्याला आक्षेप घेत सभापतींच्या समोरील हौदात धाव घेतली. आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केला की, शासनाला कोळसा ब्लॉक आणि म्हादई या प्रश्नांवर चर्चा झालेली नको आहे. शासनाने काळ्या सूचीत असलेल्या कंत्राटदाराला कोळसा ब्लॉकसंबंधी सल्लागार म्हणून नेमले आहे. गदारोळामुळे सभापती राजेश पाटणेकर यांनी ३० मार्चला एकूण २ वेळा सभागृह स्थगित केले.