विशाळगडावरील अतिक्रमण हटवून गडाचे संरक्षण आणि संवर्धन करावे, यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

गड संवर्धनासाठी प्रशासन कार्यरत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिपादन

निवेदन स्वीकारतांना रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी
निवेदन स्वीकारतांना रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी

रामनाथ (जिल्हा रायगड), २९ मार्च (वार्ता.) – विशाळगडावर झालेली अतिक्रमणे हटवून सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड येथील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन स्वीकारतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यातील संवर्धनासाठी प्रशासन कार्यरत आहे. पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत रायगडाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न करत आहोत. गडांचे पावित्र्य राखले पाहिजे.’’

या वेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर, श्री. सुनील कदम, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता उमेश आठवले, विश्‍व हिंदु परिषदेचे सामाजिक समरसता आयाम जिल्हा प्रमुख श्री. श्रीराम ठोसर, अधिवक्ता नीलेश म्हात्रे, सनातन संस्थेच्या सौ. विशाखा आठवले, तसेच धर्मप्रेमी श्री. मनेक पटेल उपस्थित होते.