सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – पाण्याचा बेसुमार वापर टाळणे, वाहते पाणी भूमीत जिरविणे हाच पाण्याची बचत करण्याचा मार्ग आहे. याचा प्रारंभ प्रत्येकाने स्वत:पासून केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘जलपूजन आणि जलशपथ’ या कार्यक्रमात केले.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जलजीवन मोहिमेच्या अंतर्गत जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘जलपूजन आणि जलशपथ’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी आणि स्वच्छता), जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच जलपूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हापसेकर पुढे म्हणाले, ‘‘पृथ्वीवर ७० टक्के पाणी आणि ३० टक्के भूभाग आहे. यातील शेती आणि तहान भागवण्याकरता लागणार्या पाण्याचे प्रमाण १ टक्का आहे. जिल्ह्यात प्रतिवर्षी ४ सहस्र ५०० मिलिमीटर पाऊस पडतो; मात्र सर्व पाणी समुद्रास जाऊन मिळते. जिल्ह्यात असणार्या चिर्यांच्या खाणीत पावसाच्या पाण्याची साठवणूक केल्यास येथील पाण्याची पातळी वाढू शकते.’’
या वेळी प्रजीत नायर म्हणाले की, पाण्याची बचत करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात मोठे संकट आपल्यासमोर उभे रहाणार आहे. पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी पावसाचे पाणी भूगर्भात सोडणे आवश्यक आहे. यासाठी शासन काम करत असून जिल्हावासियांनी आपले दायित्व ओळखून या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.