मालवण – राज्यभरातून येथे येणार्या पर्यटकांच्या काही गाड्यांवर भारत सरकार, राज्य सरकार, पोलीस किंवा काही लोकप्रतिनिधी यांच्या नावांच्या पाट्या लावलेल्या असतात. यावर सरकारी यंत्रणेने त्वरित लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात बापर्डेकर पुढे म्हणतात की, गाड्यांवर विविध पाट्या लावून येणारे पर्यटक सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा राज्य आदी ठिकाणी आपला प्रवास पथकर न भरता करतात. काही नावांचे फलक पाहिल्यावर त्यांना सरकारी अधिकारी समजून कुठेही रोखले जात नाही, तसेच रोखताही येत नाही किंवा त्यांना हवी असलेली सेवा चांगल्या दर्जाची मिळावी हा त्यांचा हेतू असावा. असे सरकारी फलक लावून सर्वत्र फिरण्यास अशा लोकांना कोण अनुमती देते ? अशा गाड्या शासकीय सचिव, अधिकारी, मंत्री यांना सरकारी कामासाठी असतांना याचा दुरुपयोग कसा होतो ? ही शासकीय पैशांची उधळपट्टी आणि दुरुपयोग करायला यांना कुणी अनुमती दिली.
या प्रत्येक वाहनाची गणना होत नाही का ? सरकारची गाडी आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का ? या वाहनांची प्रतिदिन गणना होत नाही का ? या सरकारी गाड्या बाहेर जातातच कशा ? या सर्व प्रकाराची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी त्या त्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या वतीने सखोल चौकशी करावी.