कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्याने कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २२ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अनेक कडक निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यक्रम आयोजित करतांना जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे; परंतु कोरोनाचे नियम डावलून एका खासगी कार्यक्रमात कोरेगाव (जिल्हा सातारा) नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे यांनी कोरोनाचे नियम मोडले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी कोरेगाव येथील व्यापारी आणि नागरिक करत आहेत.

कोरेगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला आणि बालकल्याण विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. कदम, तसेच कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे यांचा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवाजीनगर विभागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी कुणीही सामाजिक अंतर ठेवले नाही. तसेच ‘मास्क’ लावला नाही. कोरेगाव शहरातील विविध व्यावसायिक, ग्राहक, तसेच प्रवासी यांनी ‘मास्क’ लावले नाही, म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे या गौरव सोहळ्यात सहभागी सर्व दोषींवर कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी कोरेगाव येथील व्यापारी करत आहेत.