महिलांचा योग्य सन्मान भारतासह जगात राखला जात नाही. तिला केवळ उपभोग घेणारी वस्तू म्हणून पाहिले जात असल्याने अशा घटना घडत आहेत. यावर ठोस आणि परिणामकारक उपाय काढल्याविना त्या थांबू शकत नाहीत, हेच वास्तव आहे. यासाठी भारताने पुढाकार घेऊन धर्मशिक्षण देऊन जनतेमध्ये नैतिकता निर्माण करून जगासमोर आदर्श ठेवला पाहिजे !
नवी देहली – जगभरातील १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३ मुलींपैकी एकीला शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला एकदा तरी बळी पडावे लागते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून देण्यात आली आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली दिसत आहे, असेही यात म्हटले आहे. हिंसाचार रोखण्यासाठी, पीडितांना मिळणार्या सेवा सुधारण्यासाठी आणि आर्थिक विषमतेमुळे सांभाळाव्या लागणार्या अपमानास्पद नात्यातील तडजोडीतून महिलांची सुटका करण्यासाठी सर्व देशांच्या सरकारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन या संघटनेने केले आहे.
LIVE: Media briefing on the prevalence of violence against women with @DrTedros. #EndViolence https://t.co/tAsvZEiZk7
— World Health Organization (WHO) (@WHO) March 9, 2021
१. जगभरातील १५ ते ४९ वर्षे वयोगटातील जवळपास ३१ टक्के म्हणजे ८५ कोटी महिलांना शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागले आहे. असा निष्कर्षही जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवला आहे.
२. गरीब देशांमध्ये अशा अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांची संख्या मोठी असून त्यांचे पती किंवा अत्यंत जवळची व्यक्तीच यात सहभागी असतात; मात्र अशा अत्याचारांविरुद्ध तक्रार करण्याचे प्रमाण खूपच अल्प असल्याने प्रत्यक्ष झालेले गुन्हे आणि नोंदवण्यात आलेल्या तक्रारी यात प्रचंड भेद आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.