SC On Rape Cases : प्रेमसंबंध तुटल्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला नको !

नवी देहली – जे नाते विवाहापर्यंत पोचत नाही, त्यात बलात्कारासारखे गुन्हे नोंदवले जात आहेत. हे चुकीचे आहे. नातेसंबंधात रहाणे हे गुन्ह्यासारखे झाले आहे. एखाद्याशी ‘ब्रेकअप’ (प्रेमसंबंध तुटणे) झाल्यास त्याचा अर्थ ‘बलात्कार झाला’, असा होत नाही. प्रेमसंबंध बिघडणे आणि वेगळे रहाणे यांनंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवायला नको, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यावर मत मांडले. एका व्यक्तीने त्यांच्यावरील बलात्काराचा गुन्हा रहित करण्याची याचिका न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे. यात त्याच्यावर एका महिलेने आरोप केला आहे की, विवाहाचे आमीष दाखवून त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले.

न्यायालयाने पुढे म्हटले की,

पीडितेने ज्येष्ठ अधिवत्यांना नियुक्त केले आहे त्यामुळे ती निष्पाप आहे, असे मानले जाऊ शकत नाही. तुम्ही वयस्क आहात. त्यामुळे ‘तुम्हाला फसवून विवाहाचे वचन देऊन विश्वास संपादन केला गेला’, असे सांगू शकत नाही. तसेच रोमान्स (प्रणय) संपला अथवा ‘ब्रेकअप’ झाला याचा अर्थ बलात्काराचा गुन्हा झाला, असे नाही. समाज ज्या रितीने पालटत चालला आहे, त्यातून आपल्याला समजायला हवे की, संबंध (रिलेशनशिप) तुटणे, हा बलात्काराचा गुन्हा बनायला नको. आज नैतिकता आणि मूल्ये पालटली आहेत. विशेषत: युवा पिढी पालटत आहे. जर आम्ही हे मान्य केले, तर महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींमधील नातेसंबंध दंडनीय होतील. समजा महाविद्यालयामधील २ विद्यार्थ्यांचे प्रेम असेल. मुलाने मुलीला ‘मी तुझ्याशी विवाह करतो’ असे म्हटले, त्यानंतर त्याने काही केले नाही, तर तेदेखील गुन्हा मानला जाईल का ?