शेकापचे आमदार जयंत पाटील यांची विधान परिषदेत मागणी
चांगल्या प्रवृत्तीकडून दुष्प्रवृत्तीचा नाश केला जातो, तेव्हा ‘वध’ हा शब्द वापरला जातो. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘वध’ म्हणून उल्लेख करणे, हा त्यांचा, तसेच मराठी माणूस आणि समस्त हिंदूंच्या भावनांचा हा अवमान आहे. याचे गांभीर्य ओळखून हा प्रश्न सभागृहात उपस्थित करणारे आमदार श्री. जयंत पाटील यांचे अभिनंदन ! या विषयाचे गांभीर्य जाणून शासनाने या प्रकरणी तत्परतेने कारवाई करणे अपेक्षित आहे !
मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – शिवाजी विद्यापिठाच्या ‘बी.ए.’च्या अभ्यासक्रमाच्या भाग १, २ आणि ३ या पुस्तकांवर फडके प्रकाशनद्वारे काढण्यात आलेल्या ‘सुपर गाईड’मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘क्रूर वध’ असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. याविषयी लेखक आणि या पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री. जयंत पाटील यांनी ५ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली. माहितीच्या सूत्र (पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन)च्या अंतर्गत आमदार जयंत पाटील यांनी हे सूत्र सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊन ही कारवाईची मागणी केली.
याविषयी सभागृहात माहिती देतांना आमदार श्री. जयंत पाटील म्हणाले, ‘‘हे ‘सुपर गाईड’ पुस्तक फडके प्रकाशनचे असून त्याच्या मुखपृष्ठावर ‘मराठ्यांचा इतिहास’ असा उल्लेख आहे. देसाई आणि लिमये या टोपण नावाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठ्यांचे राज्य गमावले’, असा चुकीचा उल्लेखही करण्यात आला आहे. यासह पुस्तकात अनेक ठिकाणी महाराणी ताराबाई यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारे चुकीचा इतिहास सांगणारे लेखक आणि या पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर कारवाई करावी.’’