हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये व्यापक स्तरावर झालेला प्रसार अन् मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. यानिमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती बैठक, फेसबूक लाईव्ह, सोशल मीडिया, फलक प्रसिद्धी आदी माध्यमांद्वारे व्यापक धर्मप्रचार करण्यात आला. समाजातील विविध घटकांमधील धर्मप्रेमींनी या सभेेचा तळमळीने प्रसार केला. याला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘ऑनलाईन’ अधिवक्ता बैठक ​

१४ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्र आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते यांची ‘ऑनलाईन’ बैठक घेण्यात आली. अधिवक्त्यांनी स्वत: दायित्व घेऊन सभेचा प्रचार करण्याची सिद्धता दर्शवली. काही अधिवक्त्यांनी निमंत्रणाची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) सिद्ध करून ती स्वतःच्या ‘फेसबूक पेज’वर प्रसारित केली.

‘ऑनलाईन’ शिक्षक बैठक

‘ऑनलाईन’ शिक्षक बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेले आघात आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता यांविषयी माहिती दिली. उपस्थित सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे धर्मकार्यामध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

‘ऑनलाईन’ हिंदु जागृती बैठक

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून समितीच्या कार्याशी जुळण्यास इच्छुक असलेल्या हिंदुत्वनिष्ठ प्रोफाईल सदस्यांसाठी एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आलेे. या बैठकीला १२५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी ४० जणांनी समितीच्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गांना उपस्थित रहाण्याचे ठरवले. तसेच सभेचा प्रचार करण्यात उत्साह दाखवला.

‘ऑनलाईन’ युवा संघटन बैठक

समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ युवा संघटक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील अनेक युवक सहभागी झाले. या वेळी समितीचे कु. कुहू पांडे आणि श्री. निलय पाठक यांनी सांगितले की, भारतातील प्रत्येक युवक ऋषिपुत्र आहे. ऋषींच्या तपस्येने पवित्र झालेल्या या भूमीची संस्कृती आणि परंपरा यांचे पुनर्जीवन करण्याचे प्रथम दायित्व युवकांचे आहे.

‘ऑनलाईन’ उद्योगपती बैठक

व्यावसायिक वर्गातील हिंदुत्वनिष्ठांसाठी एका ‘ऑनलाईन’ उद्योगपती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी सभेचा उद्देश आणि प्रचार यांविषयी  माहिती देण्यात आली.

मंदिर विश्‍वस्त आणि पुजारी यांची ‘ऑनलाईन’ बैठक

पूर्वोत्तर भारतातील मंदिरांचे विश्‍वस्त आणि पुजारी यांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी मंदिरांतील वाढत्या चोर्‍या, पुजारी आणि संत यांच्या निर्घृण हत्या, मंदिरांचे सरकारीकरण यांविषयी उपस्थितांना अवगत करण्यात आले. या बैठकीमध्ये हिंदु राष्ट्राचे ध्येय साध्य होण्यासाठी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून धर्मप्रसार कसा करावा ? याविषयी ‘ऑनलाईन सोशल मीडिया’ बैठकीच्या माध्यमातून विस्तृत माहिती देण्यात आली.

‘ऑनलाईन’ पत्रकार बैठक

या बैठकीमध्ये उत्तर आणि पूर्वोत्तर भारतातील अनेक संपादकांनी सहभाग घेतला. सभेचा उद्देश ऐकून सर्व प्रभावित झाले. या वेळी उपस्थित सर्वांनी सभा यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले.
अन्य माध्यमांद्वारे प्रसार

अ. हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पेजवरून ५५ सहस्र जिज्ञासूंपर्यंत प्रसार : सभेपूर्वी ९ दिवस हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारताच्या ‘फेसबूक पेज’वरून हिंदूंच्या विविध ज्वलंत समस्यांविषयी जागृती करणारे थेट प्रसारण करण्यात आले. या माध्यमातून हा विषय ५५ सहस्र लोकांपर्यंत पोचला. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे लोकांना ‘ऑनलाईन’ सभेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

आ. भित्तीपत्रके, फलक लिखाण आणि ध्वनीफिती यांद्वारे प्रसार : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांच्या विविध जिल्ह्यांमध्ये निमंत्रणाची ३०० भित्तीपत्रके मंदिर, दुकाने, रिक्शा, सूचना फलक, विद्यालये, उपाहारगृहे या ठिकाणी आणि गल्लीबोळामध्ये लावण्यात आली. मंदिरांमध्ये फलक लिखाण करून धर्मप्रेमींना सभेला उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण देण्यात आले, तसेच श्री सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पूजा मंडळे आणि मंदिरे येथे सभेच्या ‘ध्वनीफिती’ लावण्यात आल्या.

इ. सामाजिक माध्यमे आणि दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून प्रसार : काही यू ट्यूब चॅनलने सभेचा स्वतःहून प्रचार केला. काही धर्माभिमान्यांनी फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांतून लोकांना निमंत्रण दिले. सोनपूर (बिहार) तालुक्यातील पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. सर्वोदय कुमार यांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये दूरचित्रवाणी संचाद्वारे सभेचे थेट प्रसारण केले. ते अनेक जिज्ञासूंनी पाहिले. तसेच उत्तरप्रदेशातील चमारू आणि नटवा या गावांमध्ये हिंदुत्वनिष्ठांनी दूरचित्रवाणी संचाद्वारे सभा दाखवली. ती अनेक लोकांनी पाहिली.

विशेष अभिप्राय

१. श्री. वागीश मिश्रा, अध्यक्ष, केंद्रीय देव दीपावली महासमिती, वाराणसी : तुम्ही आमचेच कार्य करत आहात. तुमचे विचार अतिशय व्यापक आहेत. राष्ट्र आणि धर्मरक्षण यांच्याविषयी तुमचे विचार ऐकून अतिशय आनंद झाला. येथून पुढे आपण सर्व कार्य मिळून करूया.

२. आचार्य विजय पाठक, वाराणसी : ‘ऑनलाईन’ बैठकीला उपस्थित राहिल्याने अतिशय आनंद झाला. हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी अनेक वर्षांपासून जाणून आहे; परंतु समिती हिंदु राष्ट्रासाठी एवढे व्यवस्थित आणि व्यापक कार्य करत आहे, हे आता समजले. अशा प्रकारची बैठक कधीही असली, तर मी नक्की उपस्थित राहीन आणि हिंदु राष्ट्रासाठी कार्य करीन.

३. गया (बिहार) येथील सुप्रसिद्ध मंगळागौरी मंदिराच्या पुजार्‍यांना सभेचा विषय अतिशय आवडला. ते समितीच्या कार्यकर्त्यांना उत्साहाने म्हणाले, ‘‘तुम्ही या निमंत्रणांच्या भित्तीपत्रकांसमवेत अन्य धर्मशिक्षण देणारे कापडी फलक आणि फ्लेक्सही लावा. हे धर्माचेच कार्य आहे.’’