५ संशयितांविरुद्ध अडीच सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट; ६१ कोटींहून अधिक अपहाराचा ठपका

पुण्यात बी.एच्.आर्. अपव्यवहाराचे प्रकरण

पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी बी.एच्.आर्. अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात ५ संशयितांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले. यानंतर उर्वरित गुन्ह्याचे पुरवणी आरोप सादर करण्यात येतील. यातील कमलाकर कोळी हा जामिनावर बाहेर आला आहे, तर उर्वरित चारही जण सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. यात ६१ कोटी ९० लाख ८८ सहस्र १६३ रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे आरोपपत्र अडीच सहस्र पानांचे आहे, असे म्हटले जाते.

बी.एच्.आर्. पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी आणि शिक्रापूर या ३ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंद आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बी.एच्.आर्. पतसंस्थेच्या पुण्यातील निगडी, घोलेरोड, आंबेगाव आणि पिंपरी-चिंचवड, तसेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एक अशा ५ मालमत्ता सील केल्या आहेत. या मालमत्तांचे मूल्य ४८० कोटी ५६ लाख रुपये आहे. संशयितांनी ही मालमत्ता केवळ ७ कोटी ४५ लाख ४४ सहस्र रुपयांत विकल्याचा ठपका ठेवला आहे. पसार असलेले सुनील झंवर आणि जितेंद्र झंवर यांच्या मालमत्ता सील करण्यात येणार आहेत. कुणाल शहा या संशयिताने बी.एच्.आर्.चे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून त्याचा पासवर्ड इतर संशयितांना दिला होता. त्यानुसार मालमत्ता विक्रीसाठी या बनावट संकेतस्थळाचा वापर झाल्याचे आरोपात म्हटले आहे.