(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरच्या नागरिकांवर लावलेल्या निर्बंधांमध्ये सूट द्यावी !’ – तुर्कस्तान

तुर्कस्तानने भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसू नये, त्याने त्याच्या देशात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे ! काश्मीरच्या सूत्रांवरून सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणार्‍या तुर्कस्तानला समजेल अशा भाषेत भारताने आता खडसावले पाहिजे !

तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलुट कावुसोग्लू

अंकारा (तुर्कस्तान) – तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलुट कावुसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये बोलतांना, ‘आम्ही भारताकडे मागणी करत आहोत की, त्याने जम्मू-काश्मीरच्या नागरिकांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये सूट द्यावी.

आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या आधारे जम्मू-काश्मीरची समस्या शांततेने आणि तेथील लोकांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवली गेल्याचे पाहू इच्छित आहोत.’ यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये तुर्कस्तानचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित केला होता.