भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे, हा तिच्या शालीनतेला धक्का ! – विशेष पोक्सो न्यायालय

• गूगलचा संदर्भ फेटाळून भारतीय संस्कृतीचा संदर्भ देऊन न्यायालयाने दिला निर्णय !

• अल्पवयीन मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करणार्‍या युवकाला सुनावली ५ वर्षांची शिक्षा !

  • ‘अपवित्र नाही’ हे दाखवून देण्यासाठी साक्षात् सीतामातेलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर महंमद गझनीपासून वाचण्यासाठी चितोडची राणी पद्मावतीसह सहस्रावधी राजपूत स्त्रियांनी जोहार केला ! कुठे चंगळवादाला प्रोत्साहन देणारी विदेशी कुसंस्कृती, तर कुठे महिलांच्या शालीनतेला महत्त्व देणारी हिंदु संस्कृती ! अशा महान संस्कृतीचा संदर्भ न्यायदानाच्या प्रक्रियेत झाल्यास समाजातील नैतिकता टिकून राहील.
  • भारतीय राज्यघटना आणि कायदे यानुसार भारतीय न्यायालय चालते. पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या गूगलवरील जागतिक संदर्भातील अर्थ भारतीय समाजजीवन, मानसिकता, रित, संस्कृती यांना लावून कसे चालतील ? एवढेही आरोपीच्या अधिवक्त्यांना समजत नाही का ?

मुंबई – ‘संवेदनशील’ किंवा ‘खासगी भाग’ हे शब्दप्रयोग आपल्या समाजातील अर्थानुसार ग्राह्य धरायला हवेत. आरोपीच्या अधिवक्त्यांनी गूगलवरील व्याख्येचा संदर्भ देत ‘पार्श्वभाग हा काही संवेदनशील असू शकत नाही’, असे म्हटले; मात्र आपल्या सामाजातील संदर्भानुसार विचार केला, तर हा अर्थ स्वीकारला जाणार नाही.

भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे, हा तिच्या शालीनतेला धक्का आहे, असे स्पष्ट करत अल्पवयीन मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग करणार्‍या युवकाला येथील विशेष पोक्सो न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली.

१. वर्ष २०१७ मध्ये १० वर्षांची मुलगी मैत्रिणीसह मंदिरात जात असतांना तिच्या घराजवळ असलेल्या काही मुलांपैकी एका २२ वर्षाच्या युवकाने तिच्या पार्श्वभागाला स्पर्श केला. यामुळे घाबरलेल्या मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढे आरोपीची जामिनावर मुक्तता झाली.

२. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या अधिवक्त्याने ‘मुलीच्या आईने आरोपीने मुलीची छेड काढल्याचे म्हटले; पण छेड काढणे आणि स्पर्श करणे यांत भेद आहे, तसेच पार्श्वभाग हा गुप्त भाग म्हणता येणार नाही’, अशी भूमिका न्यायालयात मांडली. (यावरून आरोपीच्या अधिवक्त्यांची विकृत मानसिकताच लक्षात येते. अशा अधिवक्त्यांवर न्यायालयाने कारवाई करावी, ही अपेक्षा ! – संपादक)

३. यावर न्यायालयाने ‘आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या हेतूने मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केला नाही, असे म्हणता येणार नाही. आरोपीने तिची केवळ छेडछाड काढली नाही, तर तिला अयोग्यरित्या स्पर्श केला’, असे नमूद करत मुलीचा विनयभंग झाल्याचे स्पष्ट करत आरोपीला शिक्षा दिली.