एल्.ई.डी. बल्ब प्रकल्प निधी वाढवून द्या ! – शिवसेनेचे निवेदन

महापालिकेतील अधिकारी सहदेव कावडे यांना निवेदन देतांना शिवसैनिक

सांगली, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात येणार्‍या प्रस्तावित एल्.ई.डी. बल्ब प्रकल्पात पालट करून २५ कोटी रुपयांचा निधी वाढवून द्या, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले. या वेळी रावसाहेब घेवारे, अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रसाद रिसवडे, प्रकाश लवटे, प्रभाकर कुरळपकर, शिवम् शहा उपस्थित होते.

महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात विद्युत् खाबांवर एल्.ई.डी. बल्ब बसवण्यात आले आहेत. हे दिवे योग्य प्रकारे न बसवल्याने प्रकाश नीट पडत नाही आणि त्यामुळे शहराचे सौंदर्य मार खाते. तरी महापालिकेने या दिव्यांऐवजी ऑक्टागोनाल खाबांवरती सदरचे पथदिवे बसवावेत. असे केल्याने या मार्गावरून होणार्‍या छोट्या-मोठ्या अपघातापासून वाहनधारक आणि नागरिक यांचे संरक्षण होण्यास साहाय्य होईल.