पुणे – पानिपतच्या युद्धानंतर हार न मानता मराठ्यांनी शौर्याने लढवून देहली मिळवली आणि देहलीवर ३० वर्षे राज्य केले. त्यामुळेच देशाची सीमा सतलजपर्यंत पोचली, असे मत मध्यप्रदेशातील कौशल्य विकास मंत्री यशोधरा राजे शिंदे यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने पानिपतानंतरचा मराठ्यांचा २५० वा देहली विजयदिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी अठरा पगड जातींना एकत्र केले त्याप्रमाणे आपणही सध्याच्या काळात आपल्यातील वैर विसरून आणि पूर्वीच्या चुका टाळून एकत्र आले पाहिजे, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी खासदार श्री. प्रदीप रावत, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, डॉ. उदय कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, होळकर घराण्याचे वंशज भूषण होळकर तसेच पुणे इंटरनॅशनल सेंटर व्यवस्थापक सदस्य अतुल बिनीवाले उपस्थित होते.