सिंधुदुर्गनगरी येथे थकीत वेतनासाठी सुरक्षारक्षक आणि सफाई कामगार यांचे कामबंद आंदोलन

प्रतिकात्मक चित्र

सिंधुदुर्ग – येथील सामाजिक न्याय भवन आणि वसतीगृह येथे ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेले ३५ सुरक्षारक्षक आणि ३३ सफाई कामगार गेले ८ मास वेतनापासून वंचित आहेत . त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वेतन तात्काळ मिळावे, या मागणीसाठी त्यांनी १६ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन चालू केले आहे.

शासनाच्या सामाजिक न्याय भवन आणि शासकीय वसतीगृह येथे सुरक्षारक्षक अन् सफाई कामगार कार्यरत आहेत. हे कर्मचारी पुरवण्याचा ठेका शासनाने कंत्राटदार आस्थापनांना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन आणि वसतीगृह येथे ‘भारत विकास ग्रुप प्रा.ली., पुणे’ या आस्थापनाच्या वतीने ३५ सुरक्षारक्षक, तर ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.ली., मुंबई’ या आस्थापनाच्या वतीने ३३ सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. यातील सुरक्षारक्षकांना सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ५ मासांचे वेतन, तर सफाई कामगारांना जून २०२० ते जानेवारी २०२१ या ८ मासांचे वेतन संबंधित आस्थापनांकडून देण्यात आलेले नाही. याविषयी कामगारांनी आस्थापनांचे वारंवार लक्ष वेधले; मात्र आस्थापनांकडून कोणतेही समर्पक उत्तर मिळत नाही, असा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे साहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे आंदोलन चालू  करण्यात आले आहे.