देवता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भाव अन् अंगभूत साधकत्व असलेल्या श्रीमती माधवी नवरंगे !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

देवता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भाव अन् अंगभूत साधकत्व असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ठाणे येथील श्रीमती माधवी नवरंगे !

‘ठाणे येथील सनातनच्या साधिका श्रीमती माधवी शरद नवरंगे यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणार्‍या त्यांच्या कन्या कु. सुप्रिया शरद नवरंगे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्रीमती माधवी नवरंगे

श्रीमती माधवी नवरंगे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. ‘स्वयंपाकाचा ओटा, शेगडी आणि पटल या ठिकाणी श्री अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व असते’, असा भाव असणे अन् त्यामुळे ते नेहमी तत्परतेने स्वच्छ करणे

‘आम्ही लहान असल्यापासून दोन्ही वेळांचे अल्पाहार आणि जेवण झाल्यावर आई त्वरित ओटा, शेगडी अन् पटल चकचकीत स्वच्छ करत असे अन् आम्हालाही तसे करण्यास सांगत असे. तिच्या या कृतीमध्ये आजतागायत कोणताही पालट झालेला नाही. एकदा मी तिला म्हटले, ‘‘जेवल्यावर लगेच कशाला आवरायला हवे ? जरा १५ – २० मिनिटे विश्रांती घेऊन मग आवरले, तर काय बिघडणार आहे ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘ओटा, शेगडी आणि पटल या ठिकाणी श्री अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व असते. तिचे स्थान नेहमी स्वच्छच ठेवले पाहिजे.’’ ‘तिच्यातील या भावामुळे त्याचा तिला कधी कंटाळा येत नाही’, हे माझ्या लक्षात आले.

कु. सुप्रिया नवरंगे

२. मी लहानपणापासून आई आमच्या घरी येणार्‍या प्रत्येक अतिथीची ‘अतिथि देवो भव’ या भावाने सेवा करते.

३. आईने साधिकेच्या आध्यात्मिक त्रासाविषयी ठाऊक नसतांना तिची भिन्न आणि बिकट असलेली शारीरिक स्थिती स्वीकारून तिला सर्वतोपरी साहाय्य करणे

मला लहानपणापासून तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे वयाच्या पंचविसाव्या वर्षी साधनेत येईपर्यंत माझी प्राणशक्ती पुष्कळ अल्प असे. परिणामी केवळ स्नान केले अथवा एक-दोन कपडे धुतले, तरी मला अत्यंत थकवा येऊन झोपावे लागे. अशा स्थितीमुळे मी इच्छा असूनही घरातील कामे, स्वयंपाक आदी काहीही करू शकत नसे. यात वैशिष्ट्यपूर्ण भाग असा होता की, प्राणशक्ती एवढी अल्प असूनही मी दहा-दहा घंटे अभ्यास; तीन-तीन घंटे तबला वाजवणे; घंटोन् घंटे नाटकाचा सराव करू शकत असे; गप्पा, चेष्टा-मस्करी पुष्कळ करू शकत असे; पण कपडे धुणे, भांडी घासणे, ओटा आवरणे आदी शारीरिक कामे करण्याची वेळ आली की, मला तीव्र थकवा येई. ती कामे करतांना आणि केल्यावर मी गलितगात्र होत असे. त्या वेळी ‘हा आध्यात्मिक त्रास आहे’, हे मला आणि आईलाही ठाऊक नव्हते. आईच्या जागी अन्य कुणी असते, तर ‘कामे करण्याची वेळ आली की, ही नाटक करते’, असे म्हटले असते; पण ती असे बोलली नाही. ‘आपली मुलगी एरव्ही सर्वसामान्य मुलींसारखी दिसली, वागली आणि बोलली, तरी तिची शारीरिक स्थिती सर्वांपेक्षा निराळी अन् बिकट आहे’, हे तिने जाणले अन् स्वीकारले होते. त्यामुळे ती मला घरकाम शिकवत आणि सांगत असे; पण तिने माझ्याविषयी अपेक्षा कधी केली नाही. उलट माझे प्रतिदिनचे कपडे धुण्यापासून सर्व कामे तीच करत असे.

४. आईने ‘लक्ष्मीबार’सारख्या फटाक्यांमुळे देवतेची विटंबना होत असल्याचे सांगणे आणि पुढे सनातन संस्थेत साधिकेला हेच शिकायला मिळणे

एकदा लहानपणी फटाक्यांमध्ये ‘लक्ष्मीबार’ पाहून आई आम्हाला रागावली. ती म्हणाली, ‘‘लक्ष्मीबार’वर श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असते. फटाका फुटल्यावर त्या चित्राच्या चिंध्या होतात आणि पायदळी येतात. ही देवतेची विटंबना असून ते अतिशय चुकीचे आहे. असे फटाके वाजवू नका.’’ पुढे मी मोठी होऊन सनातन संस्थेमध्ये आल्यावर मला हाच दृष्टीकोन शिकायला मिळाला.

५. साधिका आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागल्यावर तिच्या मागे तिच्याविषयी विचारल्या जाणार्‍या गोष्टींसंबंधी आईने बर्‍याच वर्षांनी मोघम सांगणे आणि त्याद्वारे साधिकेची साधनेविषयी काळजी घेणे

मी सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करू लागल्यावर आमचे नातेवाइक, मित्रमंडळी आदी आईला माझ्याविषयी, तसेच माझ्या लग्नाविषयी प्रश्‍न विचारत. आई तिच्या परीने सर्वांना परस्पर उत्तरे देई. काही प्रसंगांत तिला त्यांचे ऐकूनही घ्यावे लागत असे; मात्र माझ्यापर्यंत यांतील एकही गोष्ट तिने कधी पोचू दिली नाही. मी आश्रमात पूर्णवेळ साधिका झाल्यानंतर १२ – १३ वर्षांनी एकदा सहज विषय निघाला तेव्हा आईने मला त्या गोष्टी अगदी मोघम सांगितल्या. तेव्हाही ‘नेमके कोण, काय आणि किती बोलले ?’, हे तिने मला सांगितले नाही. याद्वारे ‘माझ्या मनात कोणताही विकल्प निर्माण न होता मला आनंदाने साधना करता यावी’, याची तिने काळजी घेतली.

६. आईने साधिकेला प्रगतीची अपेक्षा न करता साधना करण्यास सांगणे आणि त्यातून तिचा परात्पर गुरु डॉक्टर अन् संत यांच्याविषयीचा उत्कट भाव लक्षात येणे

मी एकदा आईला म्हटले, ‘‘बरीच वर्षे आश्रमात राहूनही मी अध्यात्मात प्रगती करू शकले नाही.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘तू सनातनच्या वैकुंठासमान असलेल्या रामनाथी आश्रमात रहात आहेस; प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर तिथे रहातात; श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि अन्य संत यांचा अनमोल सत्संग तुला लाभतो; यातच तुझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे. तुला असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रासाचा विचार करता, तू तिथे आहेस, हेच पुष्कळ आहे. प्रगतीची अपेक्षा करू नकोस. जीव तोडून साधना कर.’’ या वेळी आईचा रामनाथी आश्रम, परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरुद्वयी आणि सनातनचे संत यांच्याविषयीचा उत्कट भाव मला अनुभवायला मिळाला.

७. आश्रमातील कार्यपद्धती ठाऊक नसतांनाही त्यांस पूरक कृती करण्यास साधिकेला सांगणे

७ अ. आश्रमातील स्वयंपाकघरात कल्पना न देता ऐनवेळी आश्रमात न जेवण्याचा साधिकेचा निर्णय अयोग्य असल्याची आईने तिला जाणीव करून देणे : एकदा सायंकाळी आईशी दूरध्वनीवरून बोलतांना मी तिला म्हटले, ‘‘आज मी पोटभर खाऊ खाल्ला आहे. त्यामुळे रात्री जेवणार नाही.’’ मला वाटले, ‘मी आवडता खाऊ खाल्ला’, याचा तिला आनंद होईल; पण ती म्हणाली, ‘‘तू न जेवल्यास आश्रमात तुझ्या नावे करून ठेवलेले जेवण कोण जेवणार ? म्हणजे ते उरलेले उद्या साधकांना शिळे खावे लागणार. अशा प्रकारे स्वयंपाकघरात कल्पना न देता तू पोटभर खाऊ खाल्लास, हे अत्यंत चुकीचे आहे.’’ त्या प्रसंगात आईने आश्रमातील कार्यपद्धत तिला ठाऊक नसतांनाही माझी चूक सांगितली, याचे मला नवल वाटले.

७ आ. आश्रमात प्रथमच सेवा करत असूनही ऐनवेळी नियोजन पालटल्यावर आवर्जून पूर्वनियोजित सेवेला येणार नसल्याचा निरोप संबंधितांना देण्यास सांगणे : आई डिसेंबर २०१९ मध्ये जवळजवळ १३ वर्षांनी आश्रमात आली. येथे तिला पठण करण्याची सेवा देण्यात आली. चार दिवस सेवा केल्यानंतर पाचव्या दिवशी नियोजन करणार्‍या साधिकेने पठणाच्या अर्धा घंटा आधी नियोजन पालटून तिला ध्वनीचित्रचकती पहाण्यासाठी जाण्यास सांगितले. त्या वेळी आईने आवर्जून मला ती पठणाला येणार नसल्याचे संबंधित साधिकेला सांगण्यास सांगितले आणि ‘मी निरोप दिला कि नाही ?’, याचा पाठपुरावाही घेतला. खरेतर या प्रकारे निरोप देण्याची कार्यपद्धत तिला ठाऊक नव्हती. तरीही ‘आपण आज येणार नसल्याचे पुढे कळवले पाहिजे; म्हणजे ते अन्य कुणाचे तरी नियोजन करतील’, हे तिच्या लक्षात आले, हे मला विशेष वाटले.

८. पूर्वनियोजित सत्संग रहित होण्याची वेळ येणे, सत्संग होण्यासाठी आईने प्रार्थना आणि प्रयत्न करणे अन् त्यातून तिची तीव्र तळमळ आणि संतांप्रतीची श्रद्धा दिसून येणे

एकदा आमच्या इमारतीच्या गच्चीत सनातन संस्थेचा दिवसभराचा सत्संग होता. सत्संगाच्या आदल्या रात्री सर्व सिद्धता पूर्ण झाल्यावर इमारतीतील एका रहिवाशाने म्हटले, ‘‘माझ्या मुलाची महत्त्वाची परीक्षा असतांना तुम्ही सत्संग कसा आयोजित केलात ? तुमच्या आवाजाचा त्याला त्रास होऊ शकतो.’’ तेव्हा काही वेळ ‘आता सत्संग रहित करावा लागतो कि काय ?’, अशी स्थिती निर्माण झाली. त्या वेळी आईने त्वरित परात्पर गुरु डॉक्टरांना आणि श्रीकृष्णाला प्रार्थना केली. एवढेच नव्हे, तर स्वतः त्या रहिवाशाला आणि त्याच्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. ती त्या मुलाला म्हणाली, ‘‘उद्या सत्संग घेण्यासाठी ज्या दोघी येणार आहेत, त्या संत आहेत. त्यांचे दर्शन घे. मी तुला निश्‍चितपणे सांगते की, उद्याच्या सत्संगामुळे तुझ्या अभ्यासात कोणताही व्यत्यय येणार नाही. उलट तुला परीक्षा चांगली जाईल.’’ यातून आईची सत्संग होण्यासाठीची तीव्र तळमळ आणि सनातनच्या संतांप्रती असलेली दृढ श्रद्धा मला या प्रसंगात पहायला मिळाली.

९. आई अलीकडेच सनातनच्या सत्संगाला जाऊ लागली असूनही तिचे दृष्टीकोन सनातनच्या जुन्या साधकांप्रमाणे असणे

वरील प्रसंगामध्ये सत्संगाच्या सिद्धतेची सेवा करणार्‍या साधिकेला धीर देतांना आई म्हणाली, ‘‘घाबरू नकोस. नियोजनात पालट झाला, तर स्वीकारायचा आणि लगेच सांगितलेल्या पुढील कृतीला प्रारंभ करायचा. हीच तर खरी श्रद्धेची परीक्षा असते.’’ दुसर्‍या दिवशी सत्संग निर्विघ्नपणे पार पडल्यावर ती म्हणाली, ‘‘तुम्हाला ही अनुभूती यायची होती; म्हणून कालचा प्रसंग घडला.’’ वास्तविक आई अलीकडेच सनातनच्या सत्संगाला जाऊ लागली आहे; पण तिचे दृष्टीकोन जुन्या साधकांप्रमाणे असल्याचे या वेळी माझ्या लक्षात आले.

१०. संतांचे आज्ञापालन करण्यासाठी स्वतःच्या सवयीला सहज मुरड घालणे

दुसर्‍या दिवशी सत्संग चालू झाला, तेव्हा संत आमच्या घरात होते आणि मी अन् आई स्वयंपाकघरात आवरत होतो. संतांनी आईला सांगितले, ‘‘काकू, सत्संग चालू झाला आहे. तुम्ही लगेच तेथे जा.’’ खरेतर आई सर्व आवरून सत्संगाला जाणार होती; पण संतांनी सांगितल्यावर ती सर्व पसारा तसाच ठेवून लगेच वर गेली. हे तिच्या मूळ स्वभावाच्या विपरीत होते. या प्रसंगी तिने संतांचे आज्ञापालन करण्यासाठी स्वतःच्या सवयीला सहज मुरड घातल्याचे पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

माझ्यावर सुसंस्कार करणार्‍या आणि मला साधनेत वेळोवेळी साहाय्य आईच्या, तसेच गुरुमाऊलीच्या चरणी मी अपार कृतज्ञ आहे !’

– कु. सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२०)