कणकवलीत भाजपच्या १९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद, तर कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा दहन केल्याचे प्रकरण

विनायक राऊत यांचा पुतळा दहन

कणकवली – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याच्या प्रकरणी भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष, सभापती, नगरसेवक यांच्यासह १९ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर कुडाळ येथे १० कार्यकर्ते स्वत:हून पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले.

१३ फेब्रुवारीला सायंकाळी खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन आणि अवैधरित्या जमाव करून पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार राऊत यांच्यावर अश्‍लाघ्य भाषेत टीका करून धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेनेने खासदार राणे यांच्या अटकेची मागणी केली होती; तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते, तर खासदार राऊत यांनी नीलेश राणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर टीका केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांचा पुतळा दहन केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकही तैनात केले आहे.

कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित, तर ५ जणांचा शोध चालू

कुडाळ – मनाई आदेशाचा भंग करत झारापतिठा येथे खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याच्या प्रकरणातील भाजपचे १० जण कुडाळ पोलीस ठाण्यात स्वतः उपस्थित झाले. या वेळी त्यांना या प्रकरणी तपासात सहकार्य करावे, अशा आशयाची नोटीस पोलिसांनी बजावली, तर उर्वरित ५ जणांचा शोध चालू आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.