पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई – पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे सखोल अन्वेषण केले जाईल; मात्र मागील काही दिवस, काही मास लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही पुढे आले आहेत. या प्रकरणात तसे काही होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. १३ फेब्रुवारी या दिवशी उद्धव ठाकरे शिवडी येथे ट्रान्सहार्बरच्या कामाची पहाणी करण्यासाठी गेले असतांना पत्रकारांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या अन्वेषणाविषयी विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
सौजन्य : एबीपी माझा
बीड येथील पूजा चव्हाण या युवतीने ८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. वानवडी पोलीस ठाण्यात याची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी काही ध्वनीफीती पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सुपुर्द करून या प्रकरणी सखोल अन्वेषणाची मागणी केली आहे. पूजा चव्हाण यांच्या कुटुंबियांनी पूजा हिने मानसिक तणावातून आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी ‘पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी केली आहे, तर पूजा चव्हाण हिच्या कुटुंबियांनी तक्रार करायला हवी, असेे पोलिसांनी म्हटले आहे.