आतापर्यंत किती बनावट मतदान ओळखपत्र बनवली जाऊन मतदान झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
संभाजीनगर – निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती चोरून एका खासगी संकेतस्थळाच्या साहाय्याने केवळ ५०० रुपयांमध्ये बनावट मतदान ओळखपत्र बनवले जात असल्याचा प्रकार गारखेड्यातील गजानननगर भागात उघडकीस आला. ‘डिजिटल सर्व्हिस सेंटर आणि मल्टी सर्व्हिसेस’च्या नावाखाली हरीश वाघमारेे आणि नवनाथ शिंदे हे २ तरुण ‘रॅकेट’ चालवत होते. हा प्रकार महसूल प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांच्या साहाय्याने बनावट ग्राहक पाठवून धाड घातली आणि या दोघांना अटक केली. केवळ सरकारी आणि सरकारच्या वतीने नियुक्त एजन्सीलाच मतदान ओळखपत्र बनवण्याचा अधिकार असतांना खासगी संस्थेद्वारे सर्रास हा गोरखधंदा चालू आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून चोरून माहिती घेऊन हे ओळखपत्र बनवण्यात येत असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी एक तरुण तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात मतदान ओळखपत्र सिद्ध करण्यासाठी गेला होता; परंतु त्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. काही दिवसांनी तो पुन्हा गेला असता त्याने मी २०० रुपयांमध्ये बाहेरून कार्ड बनवून घेतल्याचे तेथील कर्मचार्यांना सांगितले. त्याच्याकडचे नवीन ओळखपत्र पाहून कर्मचार्यांना धक्काच बसला; कारण मागील आठ मासात ओळखपत्राचे वाटपच झालेले नसतांना त्याच्याकडे ओळखपत्र आले कसे, याची चौकशी चालू झाली. तेव्हा पुंडलिकनगरमधील एका तरुणाकडून ओळखपत्र बनवून घेतल्याचे समोर आले. तहसीलदार शंकर लाड यांनी नायब तहसीलदार रेवणनाथ सीताराम ताठे यांना या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.