पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून गुन्हेगाराची हत्या !

भरदिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येसारखी घटना घडणे हे पोलीस खात्याला लज्जास्पद !

पुणे – येथील नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे अ‍ॅक्सिस बँकेच्या समोर ९ फेब्रुवारी या दिवशी दुपारी साडे बारा वाजता सराईत गुन्हेगार सचिन नाना शिंदे याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये सचिन शिंदे याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असावा, असा तर्क पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोणीकंद भागात सचिन याला गोल्डमॅन म्हणून ओळखले जायचे. तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे नोंद आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. गोळीबार झालेले घटनास्थळ लोणीकंद पोलीस ठाण्यापासून जवळच्या नगर हमरस्त्यालगत असून भरदिवसा येथे गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.