शेतकरी आंदोलनाविषयी चुकीची माहिती पसरवणार्‍या पाकशी संबंधित १ सहस्र १७८ ट्विटर खाती बंद करण्याचे सरकारचे ट्विटरला निर्देश !

नवी देहली – देहली सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाविषयी  चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणारी १ सहस्र १७८ पाकिस्तानी ट्विटर खाती बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. ट्विटरने अद्याप यावर कार्यवाही केलेली नाही. (ट्विटरचा हा भारतद्वेष आणि पाकप्रेम असल्याने भारताने त्याला समजेल अशा भाषेत सांगितले पाहिजे आणि भारतियांनाही ट्विटरला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे ! – संपादक)

सरकारने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात २५० ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा प्रस्ताव ट्विटरकडे दिला होता. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मागणी केली होती की, नव्या सूचीमध्ये खलिस्तान्यांप्रती सहानुभूती दाखवणारे आणि पाकिस्तानशी संबंधित खाती यांचाही यात समावेश आहे. या खात्यांवरून चुकीची माहिती पसरवण्यासह ‘किसान नरसंहार’ सारखे हॅशटॅगही वापरण्यात आले होते.