२०.९.२०१९ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील पृष्ठ क्र. ७ वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली काही मार्गदर्शक सूत्रे प्रसिद्ध झाली होती. त्यांमध्ये परात्पर गुरुदेवांनी साधना म्हणून इतरांची चूक कधी सांगावी ?, या प्रश्नाचे उत्तर सांगितले होतेे. त्यांनी सांगितले, दुसर्याच्या चुकीमुळे स्वतःला विकल्प किंवा राग येत असेल (म्हणजेच स्वतःवर नकारात्मक परिणाम होत असेल), तर साक्षीभावाने वागावे आणि त्या चुकीमुळे स्वतःवर सकारात्मक परिणाम होत असेल तर, साक्षीभाव नको.
१. चुकांविषयी झालेली विचारप्रक्रिया
वरील सूत्राचा अभ्यास करतांना माझी पुढीलप्रमाणे विचारप्रक्रिया झाली.
अ. दुसर्याची चूक पहातांना बहिर्मुखता येते; मात्र स्वतःची चूक पहातांना तसे होत नाही.
आ. दुसर्याची चूक दाखवून त्याला साहाय्य करावेसे वाटले, तरी त्याला वाईट वाटेल, अशी भीती वाटते.
इ. समोरची व्यक्ती तीच चूक वारंवार करत असते. तेव्हा तिला तिची चूक सांगून काही उपयोग नाही, असे वाटून चूक दाखवणे होत नाही.
ई. समोरची व्यक्ती अधिकारपदावर असेल, तर तिला चूक दाखवून आपल्यावर संकट ओढवून घ्यायला नको, असाही विचार मनात येतो.
२. इतरांच्या चुका दाखवणार्यांचे स्वतःच्या चुकांकडे लक्ष नसण्याची कारणे आणि त्याचे परिणाम
काही व्यक्तींना इतरांच्या चुका दाखवण्यात मोठेपणा वाटतो; पण स्वतःच्या चुकांकडे त्यांचे लक्ष नसते. याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
अ. मी प्रत्येक कृती योग्य करतो, असा त्यांना अहंभाव असतो.
आ. त्यांच्यात शिकवण्याची वृत्ती अधिक असते.
इ. त्यांच्यामध्ये प्रतिक्रियांचे प्रमाण अधिक असते.
ई. त्यांच्यात पूर्वग्रह असणे आणि इतरांना समजून न घेणे, हे स्वभावदोष प्रबळ असतात.
याचा परिणामस्वरूप इतर लोक अशा व्यक्तींपासून दूर जातात. त्यांना इतरांचे साहाय्य मिळत नाही. दुसर्याच्या चुका पाहून त्यांचे मन नकारात्मक आणि तणावाखाली आल्याने त्यांच्यामध्ये रक्तदाब अन् मधुमेह यांसारख्या व्याधी बळावतात आणि त्यांच्या साधनेची हानी होते.
३. समष्टीची हानी होऊ नये, यासाठी समष्टीची चूक दाखवणे आवश्यक
आपण एकटे या जगात राहू शकत नाही. प्रतिदिन आपला कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि समाजातील व्यक्ती यांच्याशी संबंध येतोच. अशा वेळी इतरांच्या चुकांमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो. त्या वेळी साक्षीभावाने पहाण्याला पर्याय नाही; पण हे आपल्या व्यष्टी साधनेच्या संदर्भात झाले. समष्टी साधनेत समष्टीची हानी होऊ नये, यासाठी दुसर्याला त्याची चूक दाखवणे आवश्यक आहे. त्या वेळी त्याचा परिणाम स्वतःच्या साधनेवर होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
४. मानवी मन आणि पेशीमन यांच्यातील वितुष्टासंदर्भात सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांनी ग्रंथात उद्धृत केलेली काही महत्त्वाची सूत्रे
या विषयासंदर्भात सद्गुरु अप्पाकाका (सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्या आयुर्वेदाची मूलतत्त्वे या ग्रंथातील काही उपयुक्त मार्गदर्शक सूत्रे (४ अ पासून ४ उ पर्यंत) पुढे दिली आहेत. (त्या सूत्रांना मथळे लेखकाने दिले आहेत.)
४ अ. धातू आणि पेशी यांनी बनलेले आपले शरीर एक कारखाना आहे, असे समजल्यास मन हे कारखान्याचे मालक असून पेशी कारखान्यातील कामगार असणे : (पृष्ठ क्र. ८४) मानवी शरीर म्हणजे ७५०००,०००,००००००,०००,००० पेशींची वसाहत (कॉलनी) आहे. प्रत्येक पेशीला स्वतःचे मन (पेशीमन) असते. आपले शरीर पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्तवहन संस्था, मज्जासंस्था अशा अनेक संस्थांनी बनलेले असते. प्रत्येक संस्थेत अनेक अवयव असतात. प्रत्येक अवयव रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या धातूंपासून बनलेला असतो. धातू पेशींपासून बनलेले असतात. आपल्या शरिराचे कार्य समजण्यासाठी आपले शरीर म्हणजे एक कारखाना आहे, असे समजूया. मन हे त्या कारखान्याचे मालक आहे, तर पेशी त्या कारखान्यातील कामगार आहेत.
४ आ. मानवी मन आणि पेशी यांनी समजूतदारपणा दाखवून काम केल्यास मानव आरोग्यसंपन्न होणे आणि मानवी मनाने पेशींकडून अधिक किंवा अनावश्यक काम करून घेतल्यास पेशींनी दुःखी होऊन बंड पुकारणे अन् रोग निर्माण होणे : शरिरातील कोट्यवधी पेशी मानवी मनाचे आदेश का मानतात ? कारखान्यातील कामगार जोपर्यंत त्यांना कारखान्यात मिळणारा पगार, सवलती इत्यादी इतर ठिकाणी मिळत नाहीत, तोपर्यंतच त्या कारखान्यात काम करतात आणि मालकाचे आदेश मानतात. त्याचप्रमाणे शरीरातील पेशीही स्वतःच्या स्वार्थ्यासाठी आणि उपजीविकेसाठी शरिरात राहून आपल्या मालकाचे म्हणजे मानवी मनाचे ऐकतात.
मानवी मन आणि पेशी मन यांनी समजूतदारपणा दाखवून काम केल्यास मानव आरोग्यसंपन्न रहातो. मानवी मन पेशींकडून अधिक किंवा अनावश्यक काम करून घेते, त्या वेळी पेशी दुःखी (नाराज) होतात आणि नंतर बंड पुकारतात. तेव्हा रोग निर्माण होतो.
४ इ. मानवी मनामुळे पेशींना होत असलेला त्रास
४ इ १. मानवी मन रागवलेले असतांना शरिरातील सर्व पेशींना त्रास भोगावा लागणे : (पृष्ठ क्र. ८५) जेव्हा एखादा माणूस दुसर्या माणसावर रागवतो, त्या वेळी एक मानवी मन दुसर्या मानवी मनावर रागवलेले असते; पण त्याचा त्रास शरिरातील जवळजवळ सर्व पेशींना भोगावा लागतो. रागाचा परिणाम म्हणून श्वासाची, तसेच हृदयाची गती वाढते. रक्तदाब वाढतो. शरीर थरथर कापते आणि तोंडवळा लालबुंद होतो.
४ इ २. अयोग्य मार्गाने पैसे मिळवल्यास पेशींनी बंड केल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागणे : अधिक पैसे मिळवण्याच्या लोभामुळे माणूस दिवसभर अधिक काम करतो; परंतु शरिरातील सर्व पेशी आणि शेवटी मनही थकते. अयोग्य मार्गाने पैसे मिळवल्यास मानसिक तणाव, रक्तदाब वाढणे, सांधेदुखी आणि अल्सर इत्यादी रोग होतात. (जर कारखान्याच्या मालकाने कामगारांकडून अधिक काम करून घेऊन अन्याय केला, तर कामगार बंड पुकारतात आणि मालकाचा सूड घेतात, तसेच बंड करणार्या शरिरातील पेशी स्वतःचे कॅन्सरसारख्या पेशींमध्ये रूपांतर करून किंवा असाध्य रोग निर्माण करून मानवी मनाचा सूड घेतात. कधीकधी या पेशी मेल्यावर त्या व्हायरस किंवा जंतूंच्या रूपात पुनर्जन्म घेऊन त्या व्यक्तीत संसर्गजन्य रोग निर्माण करून सूड उगवतात.
४ ई. शरिरातील पेशींना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! : कारखान्याच्या मालकाने कामगारांना विश्वासात घेऊन आणि त्यांना सुखी ठेवून त्यांच्याकडून चोख काम करून घ्यावे. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या पेशींना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या शरिरातील पेशींवर अन्याय होऊ नये, यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. आहार-विहारात कोणत्याही गोष्टीचा किंवा कामाचा अतिरेक नको.
२. इंद्रियांच्या आहारी न जाता त्यांना आपल्या ताब्यात (नियंत्रणात) ठेवावे.
३.षड्रिपूंचे निर्मूलन करावे.
४. व्यसनांच्या आधीन जाऊ नये.
५. सदाचार आणि सद्वर्तन यांचा मार्ग सोडू नये.
४ उ. मानवी मन आणि पेशीमन यांच्या सतत सहकार्याने आरोग्यसंपन्न जीवन जगता येणे आणि शरिरातील पेशीपासून धडा घेऊन आपण एकमेकांशी सहकार्य करत मैत्रीने वागल्यास सर्व समाज सुखी होणे : आपणच आपल्या शरिरातील पेशींविषयी सहानुभूती दाखवली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक तक्रारीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कृती केली पाहिजे. मानवी मन आणि पेशीमन यांच्या सतत सहकार्याने आरोग्यसंपन्न जीवन जगता येईल. पेशीमनांना मानवी मनाचा हेतू समजत असतो. ज्या वेळी हेतू स्वार्थी असतो, त्या वेळी पेशी नाराज होऊन बंड पुकारतात; परंतु ज्या वेळी निस्वार्थी हेतूने माणूस परोपकारासाठी दिवसभर काम करतो, त्या वेळी पेशीही उत्साहाने तक्रार न करता आनंदाने साथ देतात. दुसर्याला वाचवण्यासाठी एखादा माणूस जेव्हा अग्नीत उडी मारतो, त्या वेळी मानवी मन आणि पेशीमने आपले जीवन धोक्यात असतांनाही एकमेकांना मनापासून सहकार्य करतात; कारण त्यांना अपूर्व त्यागाचा सात्त्विक आनंद मिळत असतो.
शरिरातील पेशींपासून धडा घेऊन आपण एकमेकांशी सहकार्य करत मैत्रीने वागू लागलो, तर सर्व समाज सुखी होईल.
(संदर्भ : सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्या आयुर्वेदाची मूलतत्त्वे या ग्रंथातील पृष्ठ क्र. ८४ आणि ८५ वरील १६ मानवी मन व पेशी मन यांच्यातील वितुष्ट)
५. मन नकारात्मक झाल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागून त्याचा परिणाम साधनेवर होऊ शकतो, याची जाणीव ठेवून अशा वेळी चुकांकडे साक्षीभावाने पहाणे योग्य ठरणे
दुसर्याच्या चुका पाहून आपल्याला राग किंवा प्रतिक्रिया आली किंवा मन नकारात्मक झाले, तर आपल्या शरिरातील कोट्यवधी पेशींवर त्याचा परिणाम होऊन त्या बंड पुकारतील आणि आपल्याला रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागेल. याचा परिणाम साधनेवरसुद्धा होईल, याची जाणीव ठेवून अशा वेळी दुसर्यांच्या चुकांकडे साक्षीभावाने पहाणे योग्य ठरेल.
– श्री. यशवंत कणगलेकर, बेळगाव, (७.९.२०१९)