भ्रष्टाचाराने बजबजलेले प्रशासन !
नांदेड – जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील चिदगिरी ग्रामपंचायतीमध्ये वनविभागाच्या मनरेगा आणि सामाजिक वनीकरण यांच्या विविध कामांत बनावट कामगार दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात आरोपी रमेश चव्हाण आणि मनोज चव्हाण या दोघांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुराव्यानिशी भांडाफोड डॉ. मोहन चव्हाण आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी केला. याचप्रमाणे जिल्ह्यातील कामगार हिंगोली जिल्ह्यात दाखवून अशाच पद्धतीचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार वन विभागात झाला आहे, असा आरोप डॉ. चव्हाण यांनी केला.
१. आरोपींनी गावातील नागरिकांना ‘शासकीय योजना मिळवून देतो’, असे खोटे सांगून अनेकांची ओळखपत्रे, अंगठ्याचे ठसे आणि कागदपत्रे जमवून त्याआधारे शासकीय कामात भ्रष्टाचार केला आहे.
२. या नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही; मात्र त्याची नावे मनरेगा आणि वन विभागाच्या कामावर कामगार म्हणून नोंद करण्यात आली आहेत.
३. यातील बालाजी इंगोले या अल्पभूधारक शेतकर्याच्या खात्यात २० लाख रुपये मनरेगाअंतर्गत जमा करून उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
४. कामगारांच्या सूचीत गावातील मयत व्यक्ती, शासकीय नोकरदार, आधुनिक वैद्य एवढेच नाही, तर चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव टाकून देयके उचलण्यात आली आहेत. अशा प्रकारे गावातील नागरिकांची नावे मनरेगा कामगारांच्या सूचीत टाकून लाखो रुपये उचलल्याची देयके ग्रामस्थांच्या माथी मारण्यात आली आहेत.
५. या प्रकरणात गावातील नागरिक बनावट मनरेगा कामगार दाखवून आणि त्यांची बँक खाते उघडून त्यावर आलेली रक्कम आरोपींनी परस्पर घेतली आहे.