मुंबई – कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अनुमाने १० मासांपूर्वी बंद झालेली आणि त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी चालू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा येत्या १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी पुन्हा चालू होणार आहे; मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही रेल्वेसेवा चालू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल सर्वांसाठी चालू करण्यासंदर्भात २९ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रवाशांना प्रवास कधी करता येईल ?
सर्वसामान्यांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येईल.
सर्वसामान्य प्रवाशांना कधी प्रवास करता येणार नाही ?
सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी अनुमती देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
उपाहारगृहे आणि दुकाने यांसाठी वेळा
शासनाच्या नियमानुसार मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील. यासमवेतच उपाहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचार्यांची ३० टक्के उपस्थितीची अट, तसेच उपाहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे कार्यवाही राहील.