सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
२० जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ८)
भाग ७ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443195.html
१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीती आणि तिचे व्यापकत्व वर्णायला शब्दच अपुरे पडतात. लहान-लहान प्रसंगातही त्यांची अपार प्रीती अनुभवायला मिळते.
१३. मुलांवरील प्रीती
१३ अ. मुलांना स्वावलंबी बनवून हळूहळू देवावर निर्भर रहाण्यास सांगणे
१३ अ १. दिवसभर नोकरी आणि नंतर सेवा यामुळे मुलांची भेट होत नसल्याने मनाला खंत वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तुम्ही मनापासून आणि झोकून देऊन सेवा केलीत, तर तुमच्या मुलांवरही गुरुकृपा राहील’, असे सांगणे : आमची दोन्ही मुले (५ वर्षांची मुलगी अपर्णा आणि ८ मासांचा मुलगा केदार हे दोघे) धामसे येथे घरी रहात होते. आम्ही दोघे नोकरी आणि नंतर अध्यात्मप्रसार करून रात्री १२ ते १ वाजता घरी जात होतो. त्यामुळे कित्येक दिवस आमची मुलांशी भेट होत नव्हती. त्या वेळी ‘मी आई म्हणून मुलांचे काहीच करत नाही. हे माझे चुकत आहे का ?’, अशी खंत माझ्या मनाला वाटत होती आणि त्याच वेळी मला ‘सेवेचा वेळ न्यून करायला नको’, असेही वाटत होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि ते म्हणाले, ‘‘तुम्ही मुलांना घेऊन बसणार, त्यांना खेळवणार किंवा भरवणार, त्यांत मुलांना मानसिक सुख मिळेल; परंतु तुम्ही दोघांनी गुरुकार्यात झोकून देऊन सेवा केलीत, तर त्यांच्यावर गुरुकृपा होणार आहे.’’ त्यांचे हे शब्द आमच्या दोघांच्याही हृदयात कोरले गेलेे.
प्रत्यक्षातही गुरुकृपेचा वर्षाव दोन्ही मुलांवर अखंड होत असल्याची अनुभूती आम्हाला पावलोपावली येत आहे. ‘दोन्ही मुले गुरुकृपेनेच आपापल्या क्षेत्रांत यश मिळवत आहेत’, हे आम्ही आजपर्यंत अनुभवतही आलो आहोत.
१३ अ २. पूर्णवेळ साधना चालू केल्यावर ‘दोनापावला’ येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेत कार्यरत असणे, तेव्हा मुले धामसे येथे घरी रहात असल्यामुळे मनाचा संघर्ष होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘मुलांचे लाड करून त्यांना स्वतःमध्ये अडकवू नका. कर्तव्य करा; परंतु त्यांना स्वावलंबी बनवा’, असे सांगणे : आम्ही वर्ष १९९९ मध्ये पूर्ण वेळ साधना करू लागलो. त्या वेळी दोनापावला, पणजी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात आमच्या सेवेचे नियोजन केले होते. धामसे येथेही घरी सनातनचा आश्रम चालू झाला होता. तेव्हा केदार ५ वर्षांचा होता. तो इतका लहान असूनही धामसे आश्रमात कित्येक दिवस आमच्याविना अन्य साधकांसमवेत रहात होता. त्यामुळे काही वेळा माझ्या मनाचा संघर्ष होत होता. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘अनेकदा आई-वडील मुलांचे लाड करून त्यांना स्वतःमध्ये अडकवतात. आपण आपले कर्तव्य करायचे; पण ‘मुले आपल्यावर अवलंबून रहातील’, असे वागायला नको. आपल्याला त्यांना स्वावलंबी बनवता आले पाहिजे.’’
आता लक्षात येते की, ‘त्यांच्या या शिकवणुकीमुळेच केदार स्वावलंबी तर झाला आहेच; पण त्याच्यात नेतृत्वगुणही आला आहे. त्याच्या कुठल्याच कर्तृत्वात तो आमच्यावर अवलंबून राहिलेला नाही किंवा त्याने आमच्याकडून काही अपेक्षाही ठेवलेली नाही.’
१३ अ ३. दोनापावलाहून घरी जातांना प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी आठवणीने मुलांसाठी त्यांच्या आवडीचा खाऊ देणे : आम्ही दोघेही पूर्णवेळ साधना करू लागल्यावर घरी न जाता दोनापावला येथेच सेवारत होतो. आम्ही ८ दिवसांनी घरी जायचो. मुले धामसे येथे घरीच रहात होती. मी घरी जाण्यासाठी निघाले की, परात्पर गुरु डॉक्टर न विसरता नेहमी मुलांसाठी त्यांना आवडेल असा खाऊ माझ्याकडे देत होते. एकदा तर त्यांनी घरी केलेला एक मोठा केक मला केदारसाठी नेण्यास सांगितला. ‘त्या दिवशी केदारच्या परीक्षेचा निकाल लागला होता आणि तो पहिला आला होता’, हे आम्हाला घरी गेल्यावर कळले.
१३ अ ४. मुलीच्या १० वी च्या परीक्षेच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला फोंडा येथे काही तातडीच्या सेवेसाठी बोलावून घेणे, सेवा संपवून परत जातांना मुलीसाठी प्रसाद देणे आणि त्याच वेळी घरी असलेल्या मुलीलाही सूक्ष्मातून भेटून आधार देणे : मुलगी अपर्णा १० वीला होती. तेव्हाचा हा प्रसंग आहे. तिच्या परीक्षेच्या वेळीच फोंडा येथे एक तातडीची सेवा असल्याने मला फोंड्यात जावे लागले होते. अपर्णाला थोडा ताण आला होता. मी सेवा पूर्ण करून धामसे येथे परत जात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘अपर्णाची परीक्षा चालू आहे ना ? तिला खाऊ घेऊन जा.’’ तेव्हा त्यांनी तिला प्रसादस्वरूपात ८ दिवस पुरतील एवढी चॉकलेट्स दिली. मी घरी गेले आणि अपर्णाला प्रसाद दिला. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘आई, मी सामूहिक नामजपाला बसतांना प्रार्थना केली. तेव्हा सूक्ष्मातून परम पूज्य डॉक्टर माझ्यासमोर उभे राहिले. मी त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी मला प्रसाद देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले, ‘काही काळजी करू नकोस. तुला ८३ टक्के गुण मिळतील.’’
१३ अ ४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुलीला स्थुलातून आणि सूक्ष्मातून एकाच प्रकारची चॉकलेट देणे आणि ‘परीक्षेत ८३ टक्के गुण मिळतील’, असे सांगणे : प्रत्यक्षातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यासमवेत तिला प्रसादरूपात दिलेली चॉकलेट्स आणि त्यांनी सूक्ष्मातून तिला दिलेली चॉकलेट्स एकाच प्रकारची असल्याचे तिने सांगितले. तिला परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षातही परीक्षेत ८३ टक्के गुण मिळाले.
या प्रसंगात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिला (माझ्या) मानसिक आधारापासून सोडवून आध्यात्मिक स्तरावर भाव आणि श्रद्धा वाढवून रहायला शिकवले’, असे मला जाणवले.
१३ अ ५. मुलीला आयुर्वेदाच्या शेवटच्या वर्षाला सुवर्णपदक मिळाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी विशेष भेटवस्तू देऊन तिचे छायाचित्र काढायला लावणे आणि तिला मिळालेले पदक भारित करून देणे : अपर्णाला आयुर्वेदाच्या शेवटच्या वर्षीच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले. तेव्हा आमच्यापेक्षा परात्पर गुरु डॉक्टरांनाच तिचे कौतुक अधिक वाटले होते. त्यांनी तिला विशेष भेटवस्तू आणि खाऊ दिला. त्यांनी ते पदक आणि प्रशस्तीपत्रक सर्वांना पहाण्यासाठी आश्रमातील पटलावर ठेवलेे. त्यांनी तिला ते पदक गळ्यात घालून छायाचित्रही काढायला लावले. त्यानंतर त्यांनी स्वतः त्या पदकाचे निरीक्षण केले. त्या पदकावर स्वतःची बोटे फिरवून ते चैतन्याने भारित केले आणि आम्हाला त्यातील स्पंदनांचा अभ्यास करायला लावला.
‘मानसिक स्तरावर केवळ कौतुकात रममाण न रहाता आध्यात्मिक स्तरावर प्रत्येक कृतीचा, गोष्टीचा अभ्यास कसा करायचा ?’, हे यातून त्यांनी आम्हाला शिकवले. त्या वेळी ‘प्रत्येक कृती आध्यात्मिक स्तरावर कशी करायची ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)
भाग ९. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443933.html
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |