आई-बाबा, तुमच्याप्रती मनाला वाटे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !

देवद आश्रमातील श्री. अनिल कुलकर्णी आणि सौ. सुषमा कुलकर्णी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. लीना कुलकर्णी हिने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कवितारूपी कृतज्ञता येथे दिली आहे.

श्री. अनिल कुलकर्णी आणि सौ. सुषमा कुलकर्णी
कु. लीना कुलकर्णी

जन्म देऊनी कृतार्थ केले ।
प्रेमाने पालन-पोषण केले ।
कमी काही ना पडू दिले ।
उत्कृष्टपणे आम्हा घडविले ॥ १ ॥

नाही आशा अन् कसलीही अपेक्षा ।
सांभाळ करण्यात केवळ निरपेक्षता ।
किती सोसले आम्हा मोठे करण्यात ।
तरीही म्हणती आमची मुले गुणी सर्वांत ॥ २ ॥

सतत राहूनी दोघेही आनंदी ।
आमच्यावरती संस्कार करूनी ।
म्हणती नेहमी ठेवा साधी रहाणी ।
कायम असू द्या तुमची उच्च विचारसरणी ॥ ३ ॥

प्रत्यक्ष श्री गुरुमाऊली मिळाली ज्यांच्यामुळे ।
साधनेसाठी प्रोत्साहन देण्या कधीच न पडती उणे ।
नेहमी सांगती, सेवा अन् साधना करा ।
याच जन्मात मोक्षप्राप्तीचा मार्ग गाठा ॥ ४ ॥

आई म्हणजे असे केवळ वात्सल्यमूर्ती ।
बाबा म्हणती सर्वकाही ईश्‍वर करून घेई ।
दोघांचाही समान भाव श्री गुरूंप्रती ।
श्री गुरूंनीही दिला त्यांना ठाव आपल्या चरणांपाशी ॥ ५ ॥

किती लिहावे या दोघांवरती ।
अनेक गुणांचे हे दोघेही समुच्चय असती ।
सहजतेने त्यागिले ज्यांनी मोह-मायेला ।
म्हणूनच गुरूंनीही स्वीकारले त्यांच्या कुटुंबाला ॥ ६ ॥

श्री गुरूंना आम्ही बहीण-भावंडे आज प्रार्थितो ।
आपल्यासम कृतज्ञता वाटते या दोघांप्रती ।
दोघांनाही निरोगी अन् दीर्घायुष्य लाभो ।
याच जन्मात दोघेही संतपदी विराजमान होवोत ॥ ७ ॥

कुणी म्हणती बाबांपेक्षा आई श्रेष्ठ ।
पण मला वाटते दोघेही असती समान श्रेष्ठ ।
कारण दोघांमध्येही असे प्रेमाचा अनमोल साठा ।
असे हे निरपेक्ष प्रेम अनुभवले आम्ही भावंडांनी ।
म्हणूनी मनाला वाटे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ॥ ८ ॥

– कु. लीना अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक