सोलापूर – येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस १२ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात तैलाभिषेकाने प्रारंभ करण्यात आला. प्रशासनाच्या आदेशानुसार मोजक्याच मानकर्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्याला छावणीचे स्वरूप आले होते. हिरेहब्बू यांच्या वाड्याकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते, तसेच भाविकांची वर्दळ वाढू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्राप्रमुख हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून तेलाभिषेक मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून वीरतपस्वी होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, तसेच मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, शिवानंद हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींच्या हस्ते सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी मानाच्या पहिल्या आणि दुसर्या नंदीध्वजाचे पूजन मंगलमय वातावरणात, तसेच पारंपरिक वाद्यांच्या तालावर आरतीसह करण्यात आले.