मेळावली प्रकरणी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना सशर्त जामीन संमत

  • अन्य १६ जणांना अटकपूर्ण जामीन संमत

  • सर्वांना मेळावली येथे जाण्यास बंदी

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – मेळावली प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (आर्.जी.) मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १३ जानेवारी या दिवशी सशर्त जामीन संमत केला. मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना पुढील २ मास मेळावली येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मेळावलीवासियांच्या आंदोलनाला ‘आर्.जी.’ने पाठिंबा दर्शवला होता. या वेळी मेळावलीवासियांनी वाळपई येथे मोर्चा काढला होता आणि यामध्ये ‘आर्.जी.’चे मनोज परब सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी ‘आर्.जी.’चे मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट केले. या प्रकरणी मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या वेळी पणजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निवाडा दिला.

मेळावली प्रकरणी काँग्रेसचे संकल्प आमोणकर आदी मिळून एकूण १६ जणांना पणजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन संमत केला. अटकपूर्व जामीन संमत झालेल्या सर्वांना मेळावली गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांना १८ ते २२ जानेवारी या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ वाजता या काळात गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.