औरंगजेब धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई – औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे. काँग्रेसने औरंगाबाद नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘औरंगाबाद नामांतराचे सूत्र हे नवीन नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही असे सांगितले होते. आम्ही अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आलो आहोत. काँग्रेसने औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ या नामांतराला विरोध करण्याचे काही कारण नाही; कारण औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, तसेच किमान समान कार्यक्रम वेगळा आहे. यामुळे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही.’’