अन्याय झालेल्यांचा प्रश्‍नांचा वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम वृत्तपत्र करतात – दीपा बापट, गटविकास अधिकारी

तासगावात पत्रकारदिन उत्साहात

पत्रकार संघाच्या कार्यक्रमात दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी म्हणून श्री. गजानन खेराडकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना दीपा बापट आणि वैशाली बेहनजी

तासगाव (जिल्हा सांगली), ७ जानेवारी – अन्याय झालेल्या प्रत्येकाच्या प्रश्‍नांना वाचा फोडत त्याला न्याय मिळवून देण्याचे काम वृत्तपत्रे करतात. लोकशाही मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण काम वृत्तपत्रांचे आहे. त्यामुळे त्यांचे स्थान कायम अबाधित राहील, असे मत गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी व्यक्त केले. ६ जानेवारी या दिवशी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या तासगाव केंद्रप्रमुख वैशाली बेहनजी, चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पराग सोनवले उपस्थित होते.

दीपा बापट पुढे म्हणाल्या, माणसाचे जीवन अधिक धकाधकीचे झाले आहे. अनेकदा पत्रकारांना विविध कामानिमित्ताने घरापासून दूर रहावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकारांना विमा पॉलिसी गरजेची आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन तासगाव तालुका पत्रकार संघाने पुढाकार घेऊन तालुक्यातील पत्रकारांना १ लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे वाटप केले आहे. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या वेळी वैशाली बेहनजी यांनी मनोगत व्यक्त केले.

तासगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी स्वागत केले. संजय माळी यांनी प्रास्ताविक करतांना विविध सामाजिक उपक्रमांतील संघटनेचा सहभाग असल्याचे सांगितले. विमा संरक्षण योजना गेल्या १० वर्षांपासून सभासदांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तानाजीराजे जाधव यांनी आभार मानले.

विशेष

या वेळी चिंचणी प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पराग सोनवले, वाहतूक पोलीस महेश माने आणि अक्षय धुमाळ यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

शहर पत्रकार संघात साध्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा

सांगली शहर पत्रकार संघात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतांना विशाल पाटील आणि अन्य पत्रकार

सांगली – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सांगली शहर पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक ललकारचे संपादक सुभाष खराडे, दैनिक जनप्रवासचे संपादक हणमंत मोहिते, दैनिक सकाळचे शेखर जोशी, दैनिक केसरीचे हरिश यमगर, दैनिक सामनाचे प्रतिनिधी प्रकाश कांबळे, ऋषिकेश खराडे, युवा अभिनेते अमरनाथ खराडे उपस्थित होते.

आधुनिक काळातील माहितीच्या खजिन्याचा पत्रकारांनी सकारात्मक वापर करून ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात ! – वसंत भोसले

सांगली – आधुनिक काळात माहितीचा मोठा खजिना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करून पत्रकारांनी त्यांच्या ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात, असे आवाहन लोकमतचे संपादक वसंत भोसले यरांनी केले. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील वृत्तपत्र विक्रेता भवनात कार्यक्रम पार पडला. त्या वेळी हे आवाहन त्यांनी केले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, लोकमतचे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.