भाववृद्धी सत्संगाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष भावसत्संगाविषयी जाणवलेली सूत्रे

‘भाववृद्धी सत्संगाला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १५.१०.२०२० या दिवशी विशेष भावसत्संग होता. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. प्रतीक्षा हडकर

१. विशेष भाववृद्धी सत्संगाविषयी जाणवलेली सूत्रे

अ. भाववृद्धी सत्संगाच्या आरंभी श्रीकृष्णाचा श्‍लोक म्हणत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीत डोक्याखाली एक हात ठेवून जसे शेषावर झोपले होते, तसेच पलंगावर पहुडलेले सूक्ष्मातून दिसले.

आ. मला वातावरणात हलकेपणा जाणवत होता.

इ. मला भूमीचा स्पर्शही जाणवत नव्हता.

ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना माझ्या अंगावर रोमांच येत होते.

उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना ‘त्यांच्या माध्यमातून भूमाता तिच्या सर्व बाळांना या पावनभूमीत एकत्र बसवून त्यांना सत्संग देत आहे’, असे जाणवले.

ऊ. लहान बाळाला आई कळतच नसते. बाळ जसे मोठे होते, तसे ते आईला ओळखायला लागते. आई तिच्या बाळावर चांगले संस्कार करते. आई कुठेही असली, तरी तिचे लक्ष तिच्या बाळाकडे असते.

ए. हे भूमाते, या बाळांचा उद्धार करण्यासाठी तू आली आहेस ना. ही बाळे तुझ्या सहवासात दोन घंटे असणार. तू या बाळांना ६ दिवसांसाठी ऊर्जा देणार आहेस !

ऐ. एखादी कृती करतांना आईचे तिच्या बाळाकडे लक्ष असते, त्याप्रमाणे तुझेही या आध्यात्मिक जीवन जगणार्‍या बाळांकडे लक्ष असणारच ना !

ओ. या बाळांना आनंद कसा देऊ आणि काय केल्यास या बाळांना आनंद मिळेल, असे आईचे असते ना !

औ. या बाळांचा हात हातात घेऊन त्यांना भवसागरातून तारून कोण बरे श्रीहरिकडे नेऊन ठेवते, आईच ना !

२. नवरात्रीच्या ९ दिवसांत असलेल्या भावसत्संगांचे साधकांना होणारे लाभ

अ. हे भूमाते, तू सांगितलेस, ‘साधकांसाठी ९ दिवस प्रतिदिन एक घंट्याचा भावसत्संग असणार.’

आ. भाव, भक्ती, तळमळ आणि श्रद्धा या गुणांचा जणू संगमच होणार. आध्यात्मिक पोषणच करणार.

इ. साधकांना नऊ दिवस देवीचे तत्त्व मिळणार. आईला ‘ही बाळे ९ दिवसांत कधी मोठी झाली ?’, ते कळणारच नाही.

ई. ‘जगत्जननीची ही ९ दिवसांची भेट मन आणि हृदय यांना स्पर्श करणारी आहे’, हेही कळणार नाही.

उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या भाववृद्धी सत्संगाविषयी काढलेले कौतुकोद्गार सांगत असतांना माझ्या शरिरावर रोमांच येत होते. नंतर काही मिनिटे मला गरम होत होते आणि त्यानंतर मला थंडीही वाजत होती आणि माझ्या शरिरावर रोमांच येत होते.

ऊ. भाववृद्धी सत्संगाच्या आरंभापासून शेवटपर्यंत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत मी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर कोपर्‍यात बसून होते.’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक