कणकवली नगरपंचायत भाजीबाजाराच्या इमारतीच्या ठेकेदाराने फसवणूक केली ! – समीर नलावडे, नगराध्यक्ष

जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !

कणकवली – शहर नगरपंचायतीशी करार करून देखील ‘ग्लोबल असोसिएटस्’ या विकासकाने गेल्या ३ वर्षांत शहरातील भाजी बाजाराची (मार्केटची) इमारत पूर्ण केली नाही, तसेच मूळ आराखड्याऐवजी दुसराच आराखडा सिद्ध करून विकासकाने इमारतीसाठी अग्नीशमन दाखला मिळवला. हा दाखला सादर करून नगरपंचायतीचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न त्याने केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ४ जानेवारी या दिवशी झालेल्या नगरपंचायतीच्या ऑनलाईन सभेत केला. या चर्चेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

कणकवली शहरात तेलीआळीतील डी.पी. रोड आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या दरम्यानच्या भूमीवर २ वर्षांत भाजी मार्केटची इमारत बांधून ती भूमीसह नगरपंचायतीकडे हस्तांतर करण्याचा करार करण्यात आला होता. संमत झालेल्या आराखड्याप्रमाणे मार्केटकडे जाण्यासाठी ६ मीटर रूंद रस्ता सोडण्यात आलेला नाही. या इमारतीसाठी स्वतंत्र सातबारा देखील करण्यात आलेला नाही, आदी सूत्रे नलावडे यांनी मांडली. यावर ‘संयुक्त समितीने भाजी मार्केट इमारतीची अनुमती आणि प्रत्यक्ष झालेले बांधकाम यांची पाहणी करून अहवाल दिल्यानंतरच नगरपंचायतीने निर्णय घ्यावा’ अशी आपली भूमिका मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी मांडली.