‘सेल्फ चेक’ वापरून सांताक्रूझ पंचायतीमधील लाखो रुपये काढल्याविषयी होप फाऊंडेशन या संस्थेकडून तक्रार नोंद

पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) – ४ जून २०१७ ते ६ जून २०२० या कालावधीत ‘सेल्फ चेक’ वापरून सांताक्रूझ पंचायतीच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याविषयी होप फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष इनासिओ डॉमनिक परेरा यांनी पंचायतीचे अधिकारी, सचिव आणि कॅनरा बँकचे अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी खात्याकडे तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीमध्ये पंचायतीचे अधिकारी, सरपंच आणि सचिव यांनी कॅनरा बँकेच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करून पंचायतीच्या खात्यातून लाखो रुपये काढल्याचे म्हटले आहे. याशिवाय कॅनरा बँकेच्या पणजी आणि बंगळूरू शहर कार्यालयातील मुख्य निरीक्षक अधिकारी, तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडेही  तक्रार करण्यात आली आहे. होप फाऊंडेशनने माहितीच्या अधिकाराखाली पंचायतीच्या व्यवहारासंबंधी माहिती मिळवल्यानंतर पंचायतीच्या अधिकार्‍यांनी, शासकीय अधिकार्‍यांनी, तसेच बँकेच्या अधिकार्‍यांनी पंचायतीच्या खात्यातून लाखो रुपये काढले असल्याचे आढळून आले.