श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२९.१२.२०२०) या दिवशी सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये येथे पाहूया.

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. काळानुसार ईश्‍वराकडून मिळणार्‍या ज्ञानाचे स्वरूप !

१ अ. देवाकडून सर्वप्रथम कवितेच्या रूपात ज्ञान मिळणे : ‘आरंभी जेव्हा मला ईश्‍वराकडून सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले, तेव्हा सध्याच्या तुलनेत त्या वेळच्या ज्ञानाची भाषा पुष्कळ वेगळी होती. देवाकडून मला कवितेच्या रूपात ज्ञान मिळत असे. (‘कविता स्वरूपातील ज्ञान खरेच ‘ईश्‍वरी ज्ञान’ आहे’, याची सत्यता पुढील सूत्रावरून लक्षात येते. आपले मूळ धर्मग्रंथ, श्‍लोेक, स्तोत्रे हेही नेहमीच्या बोलीभाषेत नसून ते काव्य स्वरूपात आहेत. महर्षींनी नाडीपट्टीत जे ज्ञान लिहून ठेवले आहे, तेही काही ठिकाणी काव्य रूपातच आहे. सामवेदातही गाण्याचे बीज सापडते. ग्रंथराज दासबोध, संत तुकारामांच्या गाथेतील ओव्या, ज्ञानदेवांची ज्ञानेश्‍वरी हेसुद्धा काव्यरूपातच आहेत. आता या ग्रंथांचा अनेक विद्वान आणि संत यांनी सोप्या भाषेत अनुवाद करून लोकांना त्यांतील ज्ञान समजेल, असे केले आहे.)

१ आ. ‘काव्यरूपातील ज्ञान समाजातील व्यक्तींना समजणे कठीण असल्याने ते गद्यात अधिक विस्तारपूर्वक लिहिता यावे आणि मुख्यतः सामान्यांना वाचताक्षणी कळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रार्थना करण्यास सांगणे : मला मिळणारे ज्ञान काव्यात असल्याने आणि या काव्यरूपातील ज्ञानाचे पुन्हा नेहमीच्या भाषेत रूपांतर करण्यात वेळ जाऊ नये; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला देवाकडे प्रार्थना करण्यास सांगितले, ‘देवा, आपणाकडून येत असलेले हे अमूल्य ज्ञान कृपया आम्हाला समजेल अशा भाषेत आपण द्यावे.’ यामागील अजून एक महत्त्वाचा उद्देश हा आहे की, ईश्‍वरी भाषेत असलेले हेे काव्यरूपातील ज्ञान आपल्याला संपूर्ण समजेल असेही नाही. ते अत्यंत त्रोटक भाषेत आहे. ‘ते गद्यात अधिक विस्तारपूर्वक लिहिता यावे आणि मुख्यतः सामान्यांना वाचताक्षणी कळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला तशी प्रार्थना करण्यास सांगितली.

१ इ. मिळणारे ज्ञान सत्यलोकातील असल्याने ते सामान्यजनांना समजणे कठीण असणे आणि लोकांनी साधना करण्यास आरंभ केल्यास त्यांची बुद्धी सात्त्विक झाल्याने याचे महत्त्व पटून ते साधना करण्यास आरंभ करतील आणि या प्रक्रियेला तीन पिढ्यांचा कालावधी लागणार असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले त्या वेळी मला सांगायचे, ‘‘देवाकडून येणार्‍या या ईश्‍वरी ज्ञानाचा शब्द न् शब्द समष्टीसाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला मिळणारे हे ज्ञान सत्यलोकातील आहे. त्याची सत्यता ८० टक्के आहे. हे ज्ञान उच्च लोकातील असल्याने सामान्यांना त्यातील सर्वच विषय, शब्द कळतील असे नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल. लोकांनी साधना करण्यास आरंभ केला की, त्यांची बुद्धीही सात्त्विक होईल. त्यानंतर त्यांना या ज्ञानाचे महत्त्व पटून ते साधना करण्यास आरंभ करतील; परंतु ही प्रक्रिया ३ पिढ्यानंतर चालू होईल. आपण हे ज्ञान ग्रंथात छापल्याने यातील आध्यात्मिक शब्दांचा लोकांवर संस्कार होण्यासाठी तीन पिढ्यांचा कालावधी द्यावा लागेल आणि मगच समाजात हे शब्द रुळतील अन् ज्ञानाचा प्रसार होईल. या ज्ञानाची किंमत नंतरच लोकांना कळेल. म्हणतात ना, आपण लावलेल्या वृक्षाची फळे पुढची पिढीच चाखते, तसेच या ज्ञानवृक्षाचेही आहे.’’

२. देवाला संगीत कलेविषयी विचारले असता ‘स्वत: शिव हे ज्ञान आपल्याला देत असल्याचे आणि हे ज्ञान अतिशय गतीने येत असल्याचे लक्षात येणेे अन् शिवाला जवळजवळ ५०० वर्षे संगीतविषयक असे प्रश्‍न कुणीही विचारले नसल्याने हे सर्व ज्ञान देण्यासाठी शिव आतुर झाला आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

आरंभी मिळणार्‍या या ज्ञानाचा वेग एवढा प्रचंड होता की, एखाद्या गोष्टीमागील शास्त्र कळण्यासाठी देवाला प्रश्‍न विचारून तो पूर्ण होण्याआधीच उत्तर येण्यास आरंभ होत असे. मी संगीत कलेविषयी देवाला विचारले, तेव्हा लक्षात आले, ‘स्वत: शिव हे ज्ञान आपल्याला देत आहे आणि आणि ज्ञान मिळण्याची गती अधिक आहे.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी याविषयी सांगितले, ‘‘जवळजवळ ५०० वर्षे शिवाला संगीतविषयक असे प्रश्‍न कुणीही विचारले नाहीत. त्यामुळे हे सर्व ज्ञान तुम्हाला देण्यासाठी शिव अगदी आतुर झाला आहे. शिवाची तुमच्यावर कृपा आहे.’’ मला या शब्दांत परात्पर गुरु डॉक्टरांचा कृपाशीर्वाद मिळाला आणि मग केवळ संगीतच नव्हे, तर सर्वच विषयांवर मला ज्ञान मिळू लागले.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी ईश्‍वराकडून ज्ञान मिळवण्यासाठी देवाला प्रश्‍न विचारण्यास सांगणे

देवाच्या कृपेने सनातन संस्थेला जे ईश्‍वरी ज्ञान मिळत आहे, ते आजपर्यंत पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नाही. देवाला आजपर्यंत कुणीच परात्पर गुरु डॉक्टरांसारखे प्रश्‍न विचारले नाहीत. परात्पर गुरु डॉक्टर अनेक प्रश्‍न विचारतात आणि त्याची उत्तरे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना देवाकडून घ्यायला सांगतात. खरे म्हणजे ‘त्यांच्या प्रश्‍नातच उत्तर मिळण्याची शक्तीही सामावलेली असते’, असे मला वाटते. मी कित्येक वेळा प्रश्‍नालाच देवता समजून उत्तरे ग्रहण केली आहेत.

४. ज्ञानमार्गाने साधना करणारे लोक ध्यानधारणा करणारे आणि अलिप्त राहून साधना करणारे असल्याने त्यांना समष्टीशी जवळीक साधणे कठीण जात असणे

सहसा ज्ञानमार्गाने साधना करणारे लोक ध्यानधारणा करणारे, अलिप्त राहून साधना करणारे आणि अल्प बोलणारे असतात. त्यांचे सामान्य बोलणेही ज्ञानाच्या भाषेतच असल्याने इतरांना ते न समजणारे असते. त्यांच्या बोलण्यातही अध्यात्मातील मोठमोठे जड शब्द असतात, जे सामान्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेरील असल्याने त्यांना समष्टीशी जवळीक साधणे कठीण होते. ‘स्वत:ला काहीतरी अधिक ठाऊक आहे’, हे दाखवण्यासाठीही असे लोक ज्ञानाच्या अवघड भाषेत बोलण्याचा दिखावा करतात.

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकवल्याने ‘साधक नेहमीच ज्ञान मिळवतांना ‘अहं वाढू नये’, यासाठी सतर्क असणे : याबाबतीत मात्र सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक भाग्यवान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकवल्याने साधक नेहमीच ज्ञान मिळवतांना ‘अहं वाढू नये’, यासाठी सतर्क राहिले. माझाही अनुभव असाच आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला या ज्ञानप्रवाहात कधीच अडकायला झाले नाही. मी ज्ञान मिळवूनही गुरूंनी मला या ज्ञानापासून नामानिराळे ठेवले आणि आता तर ते मला म्हणाले, ‘‘आता तुमचा शब्दांच्या पलीकडचा प्रवास चालू झाला.’’ ही मोठी गुरुकृपाच नव्हे का ?

देवाच्या कृपेने पूर्वी मला जरी ईश्‍वरी ज्ञान मिळत होते आणि ते क्लिष्ट शब्दांतील असले, तरी या अवघड शब्दांचा संस्कार माझ्यावर झाला नाही. असे झाले असते, तर मी इतरांशी ज्ञानाच्याच भाषेत बोलू लागले असते आणि मग सर्वकाही अवघड होऊन बसले असते. ‘साधक आणि समाजातील लोक यांच्याशी त्यांचे होऊन बोलणे, त्यांच्याशी सोप्या शब्दांत जवळीक साधणे’, असे करता येणे’, हीच माझ्यावर असलेली गुरूंची कृपा आहे’, असे मी समजते. परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही मला ज्ञान मिळवूनसुद्धा माणसातच ठेवले, यासारखे माझे भाग्य ते कोणते ?

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याच्या त्यांच्या तीव्र जिज्ञासेमुळेच ईश्‍वराला नित्य नूतन ज्ञानाच्या रूपात साधकांच्या माध्यमातून भूतलावर उतरावे लागले असणे

‘देवाने आपल्याला अशा प्रकारे ईश्‍वरी ज्ञान देणे आणि गुरूंच्या कृपेने ते ग्रहण करता येणे’, ही एक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची कृपा आहे’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याच्या त्यांच्या तीव्र जिज्ञासेमुळेच ईश्‍वराला नित्य नूतन ज्ञानाच्या रूपात साधकांच्या माध्यमातून भूतलावर उतरावे लागले. सनातनच्या साधकांना ईश्‍वरी ज्ञान मिळण्यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांमधील मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असलेली ज्ञान मिळवण्याची तीव्र तळमळ ! ही ज्ञान ग्रहणाची तीव्र तळमळच आता ज्ञानाचा अखंड प्रवाह बनून समष्टीच्या कल्याणासाठी झटत आहे आणि यातूनच सनातनची सहस्रो ग्रंथांची ज्ञानसंपदा निर्माण होत आहे. या ज्ञानरूपी सरस्वतीदेवीच्या भूलोकातील अवतरणाला आम्हा साधकांचा कोटीशः नमस्कार !’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक