सनातनचे गोवा येथील संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सहवासात आलेल्या अनुभूती

‘ऑगस्ट २०२० मध्ये ‘कोरोना’ महामारीमुळे शासनाने घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब हे रामनाथी आश्रमात काही दिवस असतांना देवाने आम्हाला त्यांचा अनमोल सत्संग दिला. त्या कालावधीत पू. भाऊकाकांच्या समवेत खोलीत निवास करतांना मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

पू. भाऊकाका परब यांचा दत्तजयंती (२९.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे.

पू. भाऊकाका (सदाशिव) परब

पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. आनंदी आणि उत्साही : पू. भाऊकाका नेहमीच आनंदी आणि उत्साही असतात.

श्री. गिरिधर वझे

१ आ. अत्यल्प अहं : पूर्वी पू. भाऊकाकांनी गोवा येथे ‘आधुनिक वैद्य’ म्हणून शासकीय चाकरी करून स्वेच्छा निवृत्ती घेतली. नंतर ते दुर्गम खेडेगावातील रुग्णांची सोय व्हावी, यासाठी रुग्णांवर ‘होमिओपॅथी’चे औषधोपचार करत असत. तरीही नेहमीच त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ‘ते उच्चपदस्थ शासकीय अधिकारी नसून सामान्य व्यक्ती आहेत’, असे वाटते. त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यापासून स्वतःच्या नावामागे ‘आधुनिक वैद्य किंवा डॉक्टर’ ही उपाधी लावत नाहीत, हे त्यांच्यामध्ये अहं अत्यल्प असल्याचे एक उदाहरण आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावरही ते सदासर्वदा शिष्यभावात असल्याचे मला जाणवते.

१ इ. निरपेक्ष प्रेम करून जवळीक साधणे : माझी पू. भाऊकाकांशी पूर्वीपासून विशेष ओळख नव्हती. पू. भाऊकाकांमध्ये खरेतर पुष्कळ दैवी गुण आहेत. ते वय, ज्ञान, भक्तीभाव, व्यष्टी आणि समष्टी साधना अशा प्रकारे सर्वच दृष्टींनी ज्येष्ठ आहेत, तरीही त्यांच्यामधील निरपेक्ष प्रेमभाव, जवळीक साधणे, गुरुदेवांप्रतीचा अनन्यभाव, प्रत्येक सेवा परिपूर्ण करणे आदी गुणांमुळे ते खोलीमध्ये निवासाला आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याविषयी आमच्या मनात सर्वाधिक जवळीक आणि कुटुंबभावना निर्माण झाली.

१ ई. समष्टी साधनेच्या दृष्टीने विविध सूत्रे शिकायला मिळणे : त्यांच्याकडून मला ‘केर काढण्याची आदर्श पद्धत, एखादी अयोग्य कृती लक्षात आल्यास ‘आपल्यामध्ये ‘धृतराष्ट्र-गांधारी वृत्ती’ निर्माण होऊ नये अन् आश्रम आदर्श व्हावा’, यांसाठी समोरच्या व्यक्तीला सहजतेने अन् निरपेक्षपणे चूक कशी सांगावी ? आदी अनेक गोष्टी समष्टी साधनेच्या दृष्टीने पू. भाऊकाकांकडून शिकायला मिळाल्या.

२. अनुभूती

२ अ. स्वतःकडून अनेक दिवस मधे मधे परात्पर गुरु डॉक्टरांना ‘साधनेतील अडथळे दूर होऊन मला गुरुकार्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असे योगदान देता येऊ दे’, अशी प्रार्थना होणे आणि काही दिवसांतच आश्रमात संतांच्या सहवासात निवासाची संधी मिळाल्याने गुरुदेवांप्रती अतिशय कृतज्ञता वाटणे : ‘जुलै २०२० मध्ये एकदा माझ्या मनात आले, ‘‘आता महर्षि आणि संत यांच्या सांगण्यानुसार आपत्काळ चालू झाला आहे. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं, तसेच तीव्र आध्यात्मिक त्रास आदी साधनेतील अडथळे दूर झाल्याविना मी गुरूंच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यात त्यांना अपेक्षित योगदान देऊ शकत नाही.’ त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी मधे मधे परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करतो, ‘माझ्या साधनेतील अडथळे दूर होऊन मला गुरुकार्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असे योगदान देता येऊ दे.’ २०.८.२०२० या दिवशी मला निरोप मिळाला, ‘उद्या सनातनचे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब रामनाथी आश्रमात येत आहेत आणि त्यांची निवासाची व्यवस्था तुम्ही निवास करत असलेल्या खोलीत केली आहे. सध्या दळणवळण बंदी असल्याने अनिश्‍चित कालावधीसाठी ते तुमच्या समवेत खोलीत निवासाला असतील.’ त्या वेळी संत सहवासाची संधी मिळाल्याने मला गुरुदेवांप्रती अतिशय कृतज्ञता वाटली.

२ आ. काही मासांपासून प्राणायामाचे प्रकार शिकण्याचा विचार मनात येणे आणि पू. भाऊकाकांनी खोलीत निवासाला आल्यावर दुसर्‍याच दिवसापासून प्रतिदिन मंत्रपूर्वक सूर्यनमस्कार, तसेच योगासने आणि प्राणायाम करण्यास शिकवणे : काही मासांपासून ‘आपण प्राणायामाचे प्रकार शिकूया’, असा विचार माझ्या मनात येत असे; पण ‘दैनंदिन सेवा चालू ठेवून हे प्रकार शिकता यावेत’, यासाठी मी जाणकार व्यक्तीच्या प्रतीक्षेत होतो. पू. भाऊकाका खोलीत आले. त्या दिवशी सायंकाळी मी व्यायाम करतांना पाहून ते मला म्हणाले, ‘‘आपण उद्यापासून सकाळी योगासने आणि प्राणायाम’ करूया !’’ त्यावर मी कृतज्ञताभावे होकार दिला. दुसर्‍याच दिवसापासून ते कोल्हापूर येथील सनातन सेवाकेंद्रात जाईपर्यंत प्रतिदिन सकाळी ६ ते ६.३० या वेळेत त्यांनी आम्हाला योगासने आणि प्राणायामाचे विविध प्रकार शिकवले. पू. भाऊकाका प्रतिदिन मंत्रपूर्वक १२ सूर्यनमस्कार घालतात. नंतर ३० ते ४० मिनिटे योगासने आणि प्राणायाम करतात.

२ इ. पूर्वी थोडा वेळ कमरेतून वाकून सेवा किंवा व्यायाम केल्यावरही कमरदुखीमुळे औषधोपचारांसह दिवसभर विश्रांती  घ्यावी लागणे; पण पू. भाऊकाकांच्या उपस्थितीत २ सूर्यनमस्कार घातल्यावर कमरदुखीचा त्रास चालू झाल्यावर कोणतेही औषधोपचार न करता आणि सलग ३ घंटे दैनंदिन कृती केल्यावर कमरदुखी आपोआप बंद होणे : पूर्वी काही वेळ मी कमरेतून वाकून सेवा केली किंवा व्यायाम करतांना थोडाच वेळ कमरेतून वाकलो, तरी कटी(कमर)दुखीमुळे मला औषधोपचारांसह विश्रांती एक-दोन दिवस घ्यावी लागत असे. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला ‘तुम्ही कमरेतून वाकू नका आणि सूर्यनमस्कारही घालू नका’, असे सांगितले होते. पू. भाऊकाका सूर्यनमस्कार घालतांना आरंभी दोन दिवस मी शेजारी केवळ उभा रहात असे. तेव्हा पू. भाऊकाका वयाच्या ८० व्या वर्षीही शास्त्रशुद्ध १२ सूर्यनमस्कार घालतांना पाहून मला कटीदुखीविषयी माझीच लाज वाटली अन् मी त्यांच्या समवेत २ सूर्यनमस्कार घातले. तेव्हा मला कटीदुखीचा त्रास चालू झाला. त्यामुळे पू. भाऊकाका उर्वरित १० सूर्यनमस्कार घालीपर्यंत मी उभ्याने केवळ नमस्काराच्या मुद्रेत सूर्याला वंदन करत होतो. त्या वेळी त्यांच्या अस्तित्वानेच मला चैतन्यशक्ती मिळून मला आध्यात्मिक लाभ होत असे. तेव्हा २ सूर्यनमस्कार घातल्यावर कटीदुखीचा त्रास होत असूनही मी कोणतेही औषधोपचार न करता सलग ३ घंटे दैनंदिन सेवा किंवा वैयक्तिक गोष्टी करू शकत असे. नंतर माझा कटीदुखीचा त्रास आपोआप बंद होत असे. ही अनुभूती मला दोन दिवस घेता आली.

२ ई. पू. भाऊकाकांच्या सांगण्यानुसार २ सूर्यनमस्कार घातल्यावर कटीदुखीचा त्रास न होणे; पण ३ सूर्यनमस्कार घातल्यास कटी दुखत असल्याचे लक्षात येणे आणि यातून पू. भाऊकाकांची संकल्पशक्ती अन् त्यांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व मनावर बिंबणे : दोन वर्षांपूर्वी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी ‘‘तुमचा आध्यात्मिक त्रास दूर झाल्यावरच तुमचे गुडघे आणि कटी यांचे दुखणे पूर्णतः बंद होईल’’, असे मला सांगितले होते. त्यामुळे कटी आणि गुडघे दुखण्याविषयी सद्गुरु डॉ. गाडगीळकाका, तसेच आधुनिक वैद्य यांनी सांगितलेली सूत्रे अन् मला आलेली वरील अनुभूती मी पू. भाऊकाकांना सांगितली. त्या वेळी त्यांनी सुचवल्यानुसार मी प्रतिदिन २ सूर्यनमस्कार आणि योगासने करण्यास आरंभ केला. त्या दिवसापासून मी २ सूर्यनमस्कार घातल्यावरही पू. भाऊकाकांच्या संकल्पामुळे मला कटी दुखण्याचा त्रास झाला नाही; पण मी स्वतःहून ३ सूर्यनमस्कार घातले, तर माझी कटीदुखी चालू होते. या अनुभूतीवरून मला पू. भाऊकाकांची संकल्पशक्ती आणि त्यांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व माझ्या मनावर बिंबले.

२ उ. काही घंटे भावपूर्ण नामजप करण्याच्या तुलनेत पू. भाऊकाकांच्या समवेत सूर्यनमस्कार घालतांना सर्वाधिक आध्यात्मिक लाभ होणे : स्वतः काही घंटे भावपूर्ण नामजप केल्यावर मिळणार्‍या चैतन्यशक्तीपेक्षा पू. भाऊकाकांच्या समवेत मी सूर्यनमस्कार घालतांना मला सर्वाधिक चैतन्यशक्ती मिळत असे. त्यामुळे माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन आध्यात्मिक लाभ होत असत आणि सेवा करण्यासाठी माझा उत्साह दिवसभर टिकून रहात असे.

२ ऊ. पू. भाऊकाका खोलीत नसतांनाही त्यांच्या नित्य वापरातील वस्तूंद्वारे चैतन्य मिळणे : पू. भाऊकाका खोलीत निवासाला आल्यापासून खोलीतील चैतन्यामध्ये पुष्कळ वाढ झाली. ते खोलीत नसतांनाही ‘त्यांचा पलंग, गादी, अंथरूण आदींद्वारे मला चैतन्यशक्ती ग्रहण होऊन माझे आध्यात्मिक त्रास दूर होत आहेत’, असे मला जाणवले.

३. कृतज्ञता

गुरुकृपेने मला आणि श्री. राजाभाऊ सप्तर्षीआजोबा यांना पू. भाऊकाकांसमवेत खोलीत निवासाची संधी मिळाली, तसेच त्यांची सेवा करण्याच्या अनुषंगाने खारीचा वाटा उचलता आला, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टर, पू. भाऊकाका आणि साधक यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२०)

परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांनी भेट दिलेली ‘योगा मॅट’ वापरल्यावर आलेल्या अनुभूती 

‘गुरुमाऊलींनी माझ्याकडून करवून घेतलेली योगासने आणि स्वरक्षण प्रशिक्षण सेवा गुरुचरणी अर्पण झाली. त्याची पोचपावती म्हणून माझ्या परमेश्‍वराने मला अप्रतिम भेट वस्तू ‘योगा मॅट’ दिली.

२३.९.२०२० या दिवशी सायंकाळी मला ‘योगा मॅट’ मिळाल्यावर मी लगेच ती स्वच्छ करून तिची शुद्धी केली. २४.९.२०२० या दिवशी सकाळी मी ‘योगा मॅट’ची मानसपूजा आणि प्रार्थना करून तिच्यावर बसल्यावर त्यातून मला चैतन्य मिळाले. मला हलकेपणा जाणवला.

सूर्यनमस्कार घातल्यानंतर शवासनात झोपल्यावर ‘जणू मी अधांतरी झोपलो आहे’, असे वाटून मला हलकेपणा जाणवला. मी शवासनात असतांना माझे ३ मिनिटे ध्यान लागले. मला ‘योगा मॅट’मधून पुष्कळ चैतन्य मिळू लागले. ‘गुरुमाऊलींनी मला पुढे योगासन आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी जणू काही तारुण्यच प्रदान केले’, असे मला वाटायला लागले.

एरव्ही प्रतिदिन अर्धा घंटा योगासने किंवा स्वरक्षण प्रशिक्षण केल्यानंतर मला थकल्यासारखे वाटायचे. गुरुमाऊलींनी दिलेल्या ‘योगा मॅट’वर योगासने केल्यानंतर मला थकवा जाणवला नाही. उलट मला चैतन्य, हलकेपणा आणि उत्साह जाणवला.

मी गुरुमाऊलींच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात सर्व साधकांचे शरीर, मन, बुद्धी आणि साधना सक्षम होण्यासाठी त्यांना प्रेरणा अन् स्फूर्ती देऊन त्यांच्याकडून योगासने आणि स्वरक्षण प्रशिक्षण आपण करून घ्यावे. हिंदु राष्ट्राच्या महान कार्यात बहुसंख्येने साधकांना कृतीप्रवण करावे’, अशी आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– (पू.) श्री. सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर सेवाकेंद्र (२५.९.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक