शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक समीर सिनारी यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि निधनानंतर त्यांच्या पत्नीने अनुभवलेली गुरुकृपा !

२३.१.२०२५ या दिवशी समीर सिनारी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५० वर्षे होते. त्यांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयीची माहिती येथे दिली आहे.

‘दिवंगत समीर सिनारी यांना पूर्वीपासूनच साधनेची आवड होती. ते सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांनी देवाप्रती असलेल्या श्रद्धेच्या बळावर झोकून देऊन सेवा केली. त्यांच्या गंभीर रुग्णाईत स्थितीतही ते शांत, स्थिर आणि कृतज्ञताभावात होते. ते समाधानी वृत्तीचे असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे पाहून त्यांच्या कुटुंबियांना अनुभूती आल्या. ‘शांत, स्थिर, समाधानी वृत्ती आणि देवाप्रती दृढ श्रद्धा’ असलेले समीर सिनारी यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.३.२०२५)

कै. समीर सिनारी

१. यजमान बेळगाव येथे एकटेच असतांना अकस्मात् गंभीररित्या रुग्णाईत होणे आणि घरमालकांच्या साहाय्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येणे

‘१८.१.२०२५ या दिवशी रात्री १.३० वाजता मला बेळगावहून यजमानांचा (समीर सिनारी यांचा) भ्रमणभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘माझ्या डाव्या पायाला भूमीचा स्पर्श जाणवत नाही आणि डाव्या हातातून भ्रमणभाष खाली पडत आहे.’’ तेव्हा मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली आणि यजमानांना म्हणाले, ‘‘तुम्ही घाबरू नका. तुमच्या समवेत गुरुदेव आहेत. तुम्ही त्यांचे स्मरण करत रहा. आम्ही गोवा येथून निघतो. तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्याची सोय करत आहे.’’ मी यजमानांच्या घरमालकांना (काकांना) संपर्क करून त्यांना माझ्या यजमानांना रुग्णालयात भरती करायला सांगितले. त्यानंतर मी यजमानांना भ्रमणभाष केला; पण ते प्रतिसाद देत नव्हते. घरमालक माझ्या यजमानांकडे गेले असतांना त्यांना ‘यजमानांच्या खोलीचे दार आतून बंद आहे’, असे आढळले. त्यांनी हाका मारूनही यजमान दार उघडत नव्हते. तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या मुलाने खिडकीतून लोखंडी सळीच्या साहाय्याने दाराची कडी काढली आणि ते खोलीत गेले. त्यांनी यजमानांना रुग्णालयात भरती करून उपचार चालू केले.

२. रुग्णालयात अनुभवलेली गुरुकृपा

२ अ. ‘तुमच्या यजमानांना गंभीर आजार झाला असून केवळ औषधोपचार करून प्रयत्न करू शकतो’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : आम्ही (मी, माझी बहीण सौ. साधना बागवे आणि बहिणीचा मुलगा श्री. प्रणव बागवे) पहाटे ४.३० वाजता बेळगाव येथे पोचलो. त्या वेळी यजमान थोडे शुद्धीत होते. मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, ‘‘आम्ही आलो आहोत. तुम्ही घाबरू नका. गुरुदेव आपल्या समवेत आहेत.’’ त्यानंतर त्यांना अतीदक्षता विभागात ठेवले. तेथील आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तुमच्या यजमानांना ‘ब्रेन हिमोरेज’ (मेंदूत रक्तस्राव होणे) झाला आहे आणि शरिराच्या डाव्या बाजूला ‘पॅरालिसिस्’ (अर्धांगवायू) झाला आहे. त्यांच्या मेंदूत पुष्कळ रक्तस्राव होत आहे. त्यांच्यावर औषधोपचार करणे किंवा त्यांचे शस्त्रकर्म करणे, हे २ पर्याय आहेत. रुग्णाची ‘बायपास सर्जरी’ (हृदयाकडे रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म) केवळ ६ मासांपूर्वी झाली आहे. त्यामुळे आपण औषधोपचार करण्याचा प्रयत्न करू.’’ तेव्हा माझा नामजप चालू होता.

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून धीर देणे

श्रीमती वैष्णवी सिनारी

२ आ १. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून ‘गुरुदेव समवेत आहेत’, असे यजमानांना सांगण्यास सांगणे : १९.१.२०२५ या दिवशी दुपारी यजमानांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर (कृत्रिम श्वास घेण्याच्या यंत्रणेवर) ठेवण्यात आले. त्या वेळी मी यजमानांच्या प्रकृतीविषयी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका साधिकेला कळवले. त्यानंतर मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्या मला म्हणाल्या, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तुमच्या समवेत आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही घाबरू नका. समीर यांना निरोप द्या, ‘तुमच्याकडे गुरुदेवांचे लक्ष आहे. गुरुदेवांनी तुमचा हात पकडला आहे. तुम्ही केवळ गुरुदेवांना आठवा आणि त्यांचे स्मरण करा, नामजप करा. कसलाच विचार करू नका.’ तुम्ही माझा निरोप यजमानांच्या कानात सांगा. तुम्ही प्रार्थना आणि नामजपादी उपाय करत रहा.’’

२ आ २. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्वस्त केल्यावर साधिकेने शांत राहून नामजपादी उपाय आणि प्रार्थना करणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलल्यानंतर मला आतून शांत वाटू लागले. मला कसलीच चिंता वाटत नव्हती. मला बळ मिळून माझ्या मनाची सिद्धता झाली. मी केवळ नामजपादी उपाय आणि प्रार्थना यांकडे लक्ष दिले. २१.१.२०२५ या दिवशी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे बोलणे आठवत होते. नंतर मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, यजमानांसाठी जे योग्य आहे, ते होऊ दे. तुम्हीच आम्हाला या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शक्ती द्या.’

२ आ ३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा निरोप यजमानांच्या कानात सांगितल्यावर गुरुदेवांची कृपा अनुभवणे आणि भावजागृती होणे : रुग्णालयातील अतीदक्षता विभागात जाणे कठीण होते, तरीही परिचारिकेने मला यजमानांना पहाण्यासाठी बोलवले. मी तेथे जाऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा निरोप यजमानांच्या कानात सांगितला. तेव्हा मला त्यांच्या पूर्ण शरिराची हालचाल झाल्याचे जाणवले. त्यांच्या चेहर्‍यावर कृतज्ञताभाव दिसत होता आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. ते पाहून मी कृतज्ञता व्यक्त केली. ‘यजमानांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा निरोप देऊ शकले’, याचा मला आनंद झाला. ‘गुरुदेवांची कृपा आणि ते आमच्या समवेतच आहेत’ हे मला अनुभवता आले.

२ इ. आधुनिक वैद्यांनी यजमानांची स्थिती गंभीर असल्याचे सांगणे, तरीही गुरुदेवांच्या कृपेमुळे शांत रहाता येणे : २२.१.२०२५ या दिवशी रात्री ९.३० वाजता आम्हाला अतीदक्षता विभागात बोलावले. तेव्हा आधुनिक वैद्य आम्हाला म्हणाले, ‘‘रुग्णाचा रक्तदाब पुष्कळ अल्प आहे आणि त्यांचे हृदय बंद पडू शकते. आम्ही प्रयत्न करत आहोत; पण हृदय बंद पडले, तर सहसा पुन्हा चालू होत नाही. तुमच्या समवेत कुणी पुरुष असतील, तर त्यांना बोलावून घ्या.’’ ते बोलत असतांना मी गुरुदेवांच्या कृपेमुळे शांत होते. आम्ही अतीदक्षता विभागाच्या बाहेर येऊन आमच्या नातेवाइकांना भ्रमणभाष करून त्यांना रुग्णालयात यायला सांगितले.

३. यजमानांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. २३.१.२०२५ या दिवशी यजमानांचे निधन झाले. तेव्हा मला अश्रू अनावर झाले; पण ‘गुरुदेव आमच्या समवेत आहेत’, असे मला वाटत होते. माझा ‘सच्चिदानंद परब्रह्म जय गुरुदेव’ असा जप होत होता.

आ. यजमानांचे पार्थिव घरी आणल्यावर मला चंदनाचा सुगंध आला.

इ. त्यांचा चेहेरा हसरा, सोनेरी आणि शांत दिसत होता.

ई. एका साधिकेने सांगितले, ‘‘गुरुदेवांनी तुमच्या यजमानांचा हात पकडला आहे. काळजी करू नका.’ तेव्हा माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

उ. माझी मुलगी (कु. वामिका, वय १७ वर्षे) आणि मुलगा (कु. तेजस, वय १४ वर्षे) स्थिर होते. ते मला धीर देत होते.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी कुटुंबियांना आश्वस्त करून साधनेकडे लक्ष देण्यास सुचवणे

वरील सर्व प्रसंगांत आणि आतापर्यंत माझ्या मनात ‘आमचे पुढे कसे होईल ?’, हा विचार आला नाही. २९.१.२०२५ या दिवशी माझे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी मला पुन्हा आश्वस्त केले, ‘‘यजमानांची काळजी करू नका. गुरुदेवांचे तुम्हा सर्वांवर लक्ष आहे. तुम्ही साधनेकडे लक्ष द्या. बळ देणारे गुरुदेवच आहेत.’’ मी त्यांच्याशी बोलल्यावर मला पुष्कळ शांत वाटले. मी सर्व कुटुंबियांना त्यांचा निरोप दिला.

‘गुरुदेवा, आमच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; पण तुम्ही आम्हाला दिलेल्या साधनेच्या दृष्टीकोनांची प्रत्येक प्रसंगात आठवण करून देऊन सकारात्मक रहायला शिकवले. आमच्यासाठी तुम्हीच सर्वकाही आहात !’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती वैष्णवी समीर सिनारी (कै. सिनारी यांची पत्नी), शिरसई, तालुका बार्देश, गोवा. (१६.२.२०२५)

समीर सिनारी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. सौ. रंजना सिनारी (कै. समीर यांच्या आई, वय ७४ वर्षे)

अ. ‘समीरच्या पार्थिवाकडे पाहून तो शांत झोपला आहे’, असे मला वाटत होते.

आ. त्याचा चेहरा तेजस्वी दिसत होता.’

२. कु. वामिका समीर सिनारी

अ. ‘बाबांच्या पािर्थवाकडे बघताच क्षणी मला त्यांचा चेहरा आनंदी आणि सोनेरी दिसला.’

३. कु. तेजस समीर सिनारी

अ. ‘बाबांचा चेहरा समाधानी, सोनेरी आणि शांत दिसला.

४. सौ. रूपाली अशोक गावकर (कै. समीर यांची मेव्हणी), गांजे, फोंडा, गोवा.

अ. ‘वातावरणात दाब जाणवत नव्हता.

आ. ‘घरातील व्यक्तीचे निधन झाले आहे’, असे मला वाटत नव्हते.

इ. त्यांचा चेहरा शांत दिसत होता. त्यांच्या चेहर्‍यावर तेज दिसत होते.’

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक