६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विदेशातील एका साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे रूप आणि त्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री दश महाविद्यांशी (देवींशी) संबंधित याग करण्यात आले. या यागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची उपस्थिती लाभली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, साधकांचे सर्वच स्तरांवर रक्षण व्हावे आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊन शीघ्र ईश्वरी राज्य यावे, यांसाठी महर्षीच्या आज्ञेने हे याग करण्यात आले. १७.१०.२०२३ या दिवशी श्री त्रिपुरासुंदरीदेवीचा यज्ञ करण्यात आला. यज्ञाच्या वेळी मला बैलावर आरूढ असलेल्या श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे रूप दिसले. देवी अतिशय सुंदर होती आणि तिच्याकडून पुष्कळ तेज प्रक्षेपित होत होते. मला त्रिपुरासुंदरीदेवीच्या रूपाची जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

बैलावर आरूढ असलेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी

१. डोळे 

श्री त्रिपुरासुंदरीदेवी ध्यानावस्थेत असल्याने तिचे डोळे स्थिर आणि शांत वाटत होते. देवी जागृत ध्यानावस्थेत होती.

२. मुकुट  

अ. देवीच्या मुकुटावरील नक्षी सुबक होती. श्रीकृष्णाच्या मुकुटाप्रमाणेच देवीचा मुकुट होता. त्रिपुरासुंदरीदेवी वरिष्ठ देवता आहे, तसेच तीचैतन्याशी संबंधित आणि निर्गुण-सगुण स्तरावरील देवता आहे.

आ. देवी चंद्रनाडीशी संबंधित असल्याने तिच्या मुकुटावर चंद्र होता.

३. शेला  

देवीने दैवी कण असलेला सोनेरी रंगाचा शेला परिधान केला होता. त्रिपुरासुंदरीदेवी राजघराण्याशी संबंधित आहे. त्यामुळे तिने सोनेरी रंगाचा शेला परिधान केला होता. (‘त्रिपुरासुंदरीदेवी ‘राजराजेश्वरी’ म्हणूनही ओळखली जाते. त्यामुळे साधिकेला देवीने शेला परिधान केल्याचे दिसले.’ – संकलक)

४. देवीकडून तेज आणि चैतन्य प्रक्षेपित होणे 

अ. आरंभी देवीच्या संपूर्ण देहाभोवती आणि नंतर तिच्या चेहर्‍याभोवती तेज निर्माण झाले.

आ. देवीच्या डोळ्यांतून प्रकाशरूपी तेज संपूर्ण वातावरणात प्रवाहित झाले.

इ. देवीच्या आशीर्वाद देणार्‍या हातातून चैतन्य प्रवाहित होत होते.

५. देवीचे वाहन

अ. त्रिपुरासुंदरीदेवी राखाडी रंगाच्या बैलावर आरूढ होती.

आ. बैलात शिवतत्त्व होते. देवीमध्ये असलेल्या निर्गुण-सगुण तत्त्वामुळे तो बैल ध्यानावस्थेत होता.

इ. बैलाने गळ्यात सोन्याचा हार आणि प्रत्येक पायात सोन्याचे कडे परिधान केले होते. हे अलंकार त्याला देवीने भेट दिले होते.

६. देवीचे स्थान  

देवीचे स्थान एका जंगलात होते. तिथे नजीकच एक मंदिर आणि तळे होते. तळ्यात देवीची शक्ती प्रवाहित होत होती.

७. आकाशातील चंद्र 

त्रिपुरासुंदरीदेवीचे तत्त्व चंद्राशी संबंधित असल्याने आकाशात चंद्र दिसत होता.

८. शिकायला मिळालेली सूत्रे 

८ अ. सूक्ष्म-चित्रात केवळ सात्त्विकता येण्यासाठी प्रयत्न न करता त्यात अधिक दैवी शक्ती (स्पंदने) येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! : सूक्ष्म परीक्षण करतांना मला त्रिपुरासुंदरीदेवीच्या सभोवताली अनेक वृक्ष दिसल्याने सूक्ष्म-चित्रातही मी देवीच्या सभोवताली वृक्ष दाखवले; परंतु वृक्षांमुळे चित्रातील स्पंदने चांगली वाटत नव्हती. याविषयी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कळवले, तेव्हा त्यांनी मला ‘देवीच्या सभोवताली वृक्ष असतांना आणि वृक्ष नसतांना’, अशी दोन्ही सूक्ष्म-चित्रे काढण्यास अन् त्यांतील स्पंदनांचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यानुसार दोन्ही सूक्ष्म-चित्रांच्या स्पंदनांचा अभ्यास केल्यावर मला पुढील सूत्रे लक्षात आली.

१. चित्रात एकाहून अधिक वृक्ष रेखाटल्याने ते चित्र स्थूल स्तरावर अिधक होते, तसेच ‘वृक्षांमुळे देवीचे चैतन्य प्रवाहित होण्यात अडथळा येत आहे’, असे मला जाणवले.  जेव्हा मी चित्रातील झाडे खोडली, तेव्हा देवी अधिक व्यापक दिसू लागली, तसेच चित्रात अधिक देवत्त्व जाणवू लागले.

२. ‘सूक्ष्म-चित्रात केवळ सात्त्विकता येण्यासाठी प्रयत्न न करता त्यात अधिक दैवी शक्ती (स्पंदने) येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे’, हे मला शिकायला मिळाले.

८ आ. व्यष्टी साधना चांगली झाल्यास मन स्थिर आणि सकारात्मक रहाणे, तसेच सेवा करण्यास शक्ती मिळणे : माझ्याकडून झालेल्या एका चुकीमुळे माझे मन नकारात्मक स्थितीत होते. याच स्थितीत मी सेवा करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र मला सूक्ष्म परीक्षण करण्यास, तसेच सूक्ष्म-चित्र काढण्यास जमत नव्हते. मी माझ्याकडून झालेल्या चुकीचे चिंतन करून ‘त्या चुकीतून मला काय शिकायला मिळाले ?’, हे लिहून काढले. तेव्हा माझे मन सकारात्मक झाले. त्यानंतर मी सूक्ष्म परीक्षण करू शकले, तसेच सूक्ष्म-चित्रही काढू शकले. ‘माझी व्यष्टी साधना चांगली झाली, तरच माझे मन स्थिर आणि विचाररहित राहील अन् देव मला सेवा करण्यासाठी विचार आणि शक्ती देईल’, हे मला शिकायला मिळाले.

९. अनुभूती

अ. देवीच्या पायांतील पैंजणांची नक्षी काढत असतांना ‘जणू मी देवीच्या चरणांना स्पर्श करत आहे’, असे मला जाणवत होते. देवीचे चरण अतिशय मुलायम होते.

आ. ‘देवी माझ्या समोर उभी आहे’, असे मला तीव्रतेने वाटत होते. सूक्ष्मातून मी जितके तिचे रूप न्याहाळत होते, तितके तिचे रूप चित्रात प्रगट होत होते. त्यामुळे ‘सूक्ष्म-चित्र अधिक परिपूर्ण कसे काढायचे ?’, याविषयी मला अधिक कल्पना सुचत होत्या.

इ. ‘देवीच मला शक्ती देऊन माझ्याकडून चित्र काढून घेत आहे’, असे मला जाणवत होते.

ई. जेव्हा मी देवीला सूक्ष्मातून अनुभवण्याचा आणि तिच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा माझी सेवा सहज अन् जलद गतीने होत होती. याउलट मी जेव्हा सेवा केवळ पूर्ण करण्याकडे लक्ष देत होते, तेव्हा सेवेची गती अल्प होत होती.

उ. देवीचे चित्र रेखाटतांना मधे मधे मला अस्थिर वाटत होते. तेव्हा मी देवीला शरण जात होते आणि ‘मला स्थिर आणि शांत रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करत होते.

ऊ. देवीचे रूप अतिशय सुंदर होते. तिचे चैतन्य मी अनुभवत होते.

ए. ‘माझ्या डोक्यावर हात ठेवून देवी मला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवत होते.

‘हे त्रिपुरासुंदरीदेवी, तू मला दिव्य दर्शन दिलेस, याबद्दल मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. तुझे दिव्य दर्शन म्हणजे आम्हा साधकांवर तुझी कृपाच आहे. ‘आमचे साधनेचे प्रयत्न दिवसागणिक वाढू देत आणि आम्हाला तुझ्या अनुसंधानात रहाता येऊ दे. तुझ्या दिव्य रूपाची अनुभूती घेता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २६ वर्षे),  (६.१२.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक