‘द्वापरयुगात महाभारत युद्धाच्या वेळी जेव्हा अर्जुनाने शोकाकुल होऊन धनुष्य टाकले, तेव्हा त्याच्या रथाचे सारथ्य करणार्या भगवान श्रीकृष्णाने त्याचे अज्ञान दूर करण्यासाठी त्याला श्रीमद्भगवद्गीता सांगितली. भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनालाच गीता सांगितली नसून ब्रह्मांडातील प्रत्येक जिवाचा उद्धार करण्यासाठी गीतारूपी ज्ञानगंगा प्रवाहित केली आहे. मार्गशीर्ष शु. प. एकादशीला (२५ डिसेंबरला) असणार्या ‘गीता जयंती’ ला जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या पावन चरणी ही काव्यरूपी पुष्पांजली अर्पण करत आहे.
अर्जुन मोहजालात अडकला ।
आणि तो भ्रमाने ग्रासित झाला ॥
तो युद्धक्षेत्री शोकाकुल झाला ।
त्याने विषाद करूनी धनुष्यबाण त्यागला ॥ १ ॥
‘स्वकियांना शत्रू कसे मानावे ? ।
त्यांच्याशी कसे युद्ध करावे ? ॥
आप्तजनांना कसे मारावे ?।
या बिकट प्रसंगी काय करावे ? ॥ २ ॥
श्रीकृष्णाने अर्जुनाला दु:खी पाहिले ।
आणि त्याचे अंतरंग जाणले ॥
त्यास शोकातून मुक्त करण्याचे ठरवले ।
आणि त्याचे कल्याण योजले ॥ ३ ॥
अर्जुनाला सांगितला विषादयोग ।
कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग ॥
अर्जुनाला लाभला सुगमयोग ।
आणि त्याचा दूर झाला भवरोग ॥ ४ ॥
श्रीकृष्णाच्या मधुर वाणीतून ।
चैतन्य वाहे प्रत्येक शब्दातून ॥
जसा जीव मुक्त होतो मायापाशातून ।
तसा अर्जुन मुक्त झाला मोहजालातून ॥ ५ ॥
अर्जुनाला गूढ आत्मज्ञान झाले ।
दिव्य वाणीतून ज्ञानामृत लाभले ॥
त्याचे अस्तित्व श्रीचरणी समर्पित झाले ।
आणि त्याचे जीवन कृतार्थ झाले ॥ ६ ॥
कशी वर्णावी महती कृष्णाची ? ।
कशी वर्णावी कीर्ती देवाची ? ॥
काय सांगावी थोरवी भगवंताची ? ।
कशी सांगावी महती श्रीमद्भगवद्गीतेची ॥ ७ ॥
गीता असे सृष्टीचा मूलाधार ।
गीता असे भक्तीचा आधार ॥
गीता असे समस्त वेदांचे सार ।
गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार ॥ ८॥
अर्जुनाच्या भक्तीमय जिज्ञासेमुळे ।
आणि त्याच्या संपूर्ण शरणागत भावामुळे ॥
श्रीकृष्ण अर्जुनावर प्रसन्न झाले ।
आणि त्याच्यावर कृपावंत झाले ॥ ९ ॥
श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले ।
आणि अर्जुनाच्या जीवनाचे सार्थक झाले ॥
नररूपी अर्जुनाला नारायणाचे दर्शन झाले ।
त्याच्या दर्शनाने समस्त अज्ञान दूर झाले ॥ १० ॥
देवांनाही अर्जुनाचा हेवा वाटला ।
भीष्मांनाही संवाद ऐकावा वाटला ॥
असा दैवी गीतोपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला ।
त्याला भवसागरातून तरण्याचा मार्ग दाखवला ॥ ११ ॥
गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते ।
ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते ।
आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥ १२ ॥
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |