इतिहास तज्ञांचा विरोध !
चुकीचा इतिहास शिकवणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील सेंट्रल स्कूलमध्ये ‘बाल महाभारत कथा’ नावाच्या एन्.सी.आर्.टी.च्या पुस्तकाद्वारे ७ वीच्या विद्यार्थ्यांना चुकीचे महाभारत शिकवण्यात येत आहे. यात ‘जरासंधाने भगवान श्रीकृष्ण यांना पराजित केल्याने त्यांना मथुरा सोडून द्वारकेला जावे लागले’, असे लिहिण्यात आले आहे. यावर गीता प्रेस आणि गोरखपूर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक यांनी आक्षेप घेत ‘महाभारतामध्ये असा कुठेही उल्लेख नाही’, असे सांगितले आहे.
१. ‘बाल महाभारत कथा’ हे पुस्तक चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी लिहिले आहे. यात युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील चर्चेचा उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्ण राजसूय यज्ञाच्या निमित्ताने युधिष्ठिरशी चर्चा करत आहेत. पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ३३ वरील अध्याय १४ मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत, ‘या यज्ञामध्ये मोठी अडचण मगधचा राजा जरासंध आहे. त्याला पराजित केल्याविना यज्ञ करणे अशक्य आहे. आपण ३ वर्षांपासून त्याच्याशी युद्ध करत आहोत आणि पराजित होत आहोत. आपल्याला मथुरा सोडून दूर पश्चिमेला द्वारकेमध्ये जाऊन नगर आणि गड बनवून रहावे लागेल.’
२. दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालयाचे प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक राजवंत राव यांनी म्हटले की, एन्.सी.आर्.टी.च्या कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा अन्य कोणत्याही पुस्तकात अशा प्रकारच्या खोट्या माहितीचा वापर करणे योग्य नाही. जरासंधने श्रीकृष्णाला पराजित केल्याचा महाभारतात कुठेही उल्लेख नाही. हरिवंश पुराण किंवा अन्य कुठेही अशा प्रकारची माहिती मिळाली नाही. श्रीकृष्ण शेवटपर्यंत शांतीसाठी प्रयत्न करत राहिले, अशी माहिती आहे.
३. श्रीकृष्णाला जरासंधाला मिळालेल्या वरदानाविषयी ठाऊक होते. कोणत्याही शस्त्राने त्याचा मृत्यू होणार नाही; म्हणून श्रीकृष्णाने द्वारका बनवली. त्यामळे मथुरेतील लोक शांततेच राहू शकले. त्यानंतर भीमाच्या हातून श्रीकृष्णाने जरासंधाचा वध केला.
४. गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणि तिवारी यांनी म्हटले की, भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्याने त्याचा नातेवाईक जरासंध मथुरेवर सातत्याने आक्रमण करू लागला. प्रत्येक वेळी जरासंधाला श्रीकृष्णाने पराभूत केले. असे १६ वेळा झाले. जरासंधाचा मृत्यू भगवान श्रीकृष्णाच्या हातून नसल्याने आणि जरासंधाच्या आक्रमणामुळे मथुरेतील अनेक लोकांचा मृत्यू होत असल्याने द्वारकेला जाण्याचा निर्णय श्रीकृष्णाने घेतला.