Yogiji on Namaz On Road : रस्ते चालण्यासाठी असतात, नमाजपठणासाठी नाही !

  • उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती

  • हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिकण्याचाही दिला सल्ला !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी देहली – मेरठमध्ये रस्त्यांवर नमाजपठणाच्या संदर्भात जे आदेश निघाले ते योग्यच आहेत. रस्ते चालण्यासाठी असतात. जे लोक रस्त्यावर नमाजपठण करण्याविषयी बोलत आहेत, त्यांनी हिंदूंकडून शिस्त शिकायला हवी. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी ६६ कोटी लोक आले होते. कुठेही लुटमार, आक्रमण, छेडछाड, तोडफोड, अपहरण असले प्रकार झाले नाहीत. ही आहे धार्मिक शिस्त. श्रद्धेने आले, महास्नान केले आणि आपापल्या घरी परतले, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाजपठणावर बंदी घालण्याचे समर्थन केले. ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

उत्सव शिस्तीतच साजरे केले पाहिजेत !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, उत्सव बेशिस्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन बनता कामा नयेत. तुम्हाला सुविधा हवी असेल, तर शिस्त पाळावी लागेल. तुम्ही या सगळ्याची तुलना कावड यात्रेशी करता. कावड यात्रा हरिद्वारपासून (उत्तराखंड) गाझियाबादपर्यंत (उत्तरप्रदेश) जाते. त्यामुळे ते रस्त्यावरूनच चालणार. आम्ही कधी मुसलमान समुदायाची मिरवणूक अडवली आहे का ? मोहरमचीही मिरवणूक निघते. आम्ही हे सांगितले की, ताजियाची (मोहरमच्या मिरवणुकीतील धार्मिक मनोरा) उंची अल्प करा. हे त्यांच्याच सुरक्षेसाठी आहे; कारण वर विजेच्या तारा असतात. त्यामुळे उंची अल्प करा, असं सांगतो. विजेच्या तारांचा धक्का बसला तर जिवावर बेतू शकते.

नमाजपठणाची जागा इदगाह किंवा मशीद आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कावड यात्रेतही आम्ही सांगितले की, ‘डीजे’ची (मोठी संगीत यंत्रणेची) उंची अल्प करा. जे करत नाहीत त्यांच्यावर आम्ही तसे करण्याची सक्ती करतो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो. ईदच्या दिवशी तुम्ही घंटोन्‌घंटे नमाजपठणाच्या नावाखाली रस्ता रोखून ठेवणार का ? नमाजपठणासाठीची जागा इदगाह किंवा मशीद असू शकते. रस्ता नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे स्पष्ट आणि परखड शब्दांत देशातील एकतरी शासनकर्ता बोलतो आणि तशी कृती करतो का ?
  • योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे संन्यस्त, त्यागी आणि संत वृत्तीचे शासनकर्ते आणण्यासाठी हिंदूंनी आता संघटित प्रयत्न केले पाहिजेत !